
इराण आणि अमेरिका युद्ध पेटले आहे. या युद्धाचा परिणाम फक्त दोन किंवा तीन देशांपुरता मर्यादित राहिला नाही तर जगभरात कच्चे तेल आणि गॅसची मोठी समस्या निर्माण झाली. भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा आहे. पण पेट्रोल डिझेलचा तेवढा तुटवडा नाही. पण काही अफवा पसरवला जात असल्याने पेट्रोल पंपावर सकाळपासूनच वाहनधारकांनी मोठी गर्दी केल्याची वस्तूस्थिती आहे. राज्यातील विविध शहरांमध्ये पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी मोठ्या रांगा लावल्या आहेत. पेट्रोल मिळणार नसल्याची भीती त्यांच्या मनात आहे. जालना, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सांगली, सातारा, ठाणे, कल्याण, परभणी, बीड, नांदेड या शहरांमधील पेट्रोल पंपावर मोठ्या रांगा बघायला मिळत आहेत. सरकारकडून अगोदरच स्पष्ट करण्यात आले की, पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नाही. देशात पुरेसा साठा उपलब्ध आहे. फक्त राज्यच नाही तर देशभरातील विविध शहरांमध्ये हीच स्थिती कायम आहे.
पेट्रोल-डिझेल संपल्याच्या अफवेने राजभरात खळबळ उडाली. ठाणे-कल्याण -डोंबिवलीत इंधनासाठी नागरिकांची झुंबड उडाली. अनेक पंपांवर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने ‘नो स्टॉक’चे फलक लावण्यात आले. राज्यात गोंधळ आहे, पण मुंबईत शांतता दिसत आहे. मार्बल हिल, देसाई रोड परिसरात पंपांवर शुकशुकाट. यादरम्यानच प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले की, इंधनाचा साठा पुरेसा आहे, नागरिकांनी अफवांना बळी पडू नका.
सोलापुरातील ऑटो एलपीजी गॅस पंप बंद अवस्थेत आहेत. गॅस तुटवड्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील ऑटो एलपीजी गॅस पंप बंद ठेवण्यात आले. शहरातील प्राईम फ्युएल ऑटो एलपीजी पंप बंद करण्यात आलाय. मागील जवळपास 10 दिवसांपासून एलपीजी गॅस पंप आहे बंद. हा एलपीजी पंप बंद असल्याने ऑटो रिक्षा चालकांचे हाल होत आहेत.
नांदेड जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेल तुटवड्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट केलं आहे की, नांदेड शहरात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणारे मेसेज हे केवळ अफवा असून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. अनेक भागात अशाचप्रकारेच मेसेज व्हायरल होत असल्याने नागरिकांनी धास्ती घेतली आहे.