भरतीसाठी तो चप्पलेवर १८ मिनिटांत पाच किमी धावला, अधिकाऱ्याने दिले शूज गिफ्ट
छत्रपती संभाजीनगरातील एसआरपीएफ भरतीतील एका प्रसंगाचा एक व्हिडीओ सध्या इंस्टाग्रामवर खूपच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक तरुण चप्पलांवर भरतीत धावताना पाहून पोलिस अधिकाऱ्याने त्याची प्रेमाने चौकशी केली आणि त्याला शूज गिफ्ट दिल्याचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

परिस्थिती कितीही हलाखीची असली तरीही हार न मानता अंगात जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करुन यशाला गवसणी घालता येते. छत्रपती संभाजीनगर SRPF भरतीत याचेच एक उदाहरण पाहायला मिळाले. अकोला जिल्ह्यातील तालुका पातुर येथील नितीन कुचवरे या उमेदवाराने पायात साधी सँडल घालून तब्बल पाच किलोमीटरचे अंतर अवघ्या १८ मिनिटांत कापले. यावेळी त्याच्या पायात साध्या चपला असल्याचे पाहून तेथील एसआरपीएफचे कमांडंट विक्रम साळी यांनी या तरुणाची विचारपूस केली आणि त्याला शूज गिफ्ट दिले.
सध्या इंस्टाग्रामवर SRPF Gr.14 छत्रपती संभाजीनगर या पेजवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओला ६० लाख लोकांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. हा व्हिडीओ पाहणाऱ्या अनेकांना या तरुणाच्या जिद्दीची कहाणी आणि पोलिसातील माणूसकी पाहून गहीवरुन आले आहे.
या तरुणाला पायात चपला असताना पाच किलोमीटरचे अंतर १८ मिनिटांत पार करताना पाहून कमांडंट विक्रम साळी यांना राहावले गेले नाही. त्यांनी या तरुणाची आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्याला शूज गिफ्ट देत आशीवार्द दिला. हजारो उमेदवारांच्या गर्दीत त्याच्या पायाकडे साळी यांनी पाहिले आणि त्याला ही म्हटले तर ही छोटीशी मदत केली आहे.ही छोटीशी मदत मिळाल्यानंतर नितीन कुचवरे यांनी पोलिस अधिकाऱ्यांचा पायाला स्पर्श करुन त्यांचे आशीर्वाद घेतला आहे.
छत्रपती संभाजीनगर गट क्रमांक 14 मध्ये SRPF 20 वरणगाव या गटाची भरती सुरू आहे. यासाठी जवळपास 75,000 अर्ज आले आहेत दररोज आम्ही 2000 उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलावतो. काल पाच किलोमीटरची रनिंग एका उमेदवाराने चक्क सँडलवर पूर्ण केली, तीही कमी वेळेत, मला वाटले त्याला विचारावे की तू सँडल वर का पळालास ? तर त्याने असे उत्तर दिले की शूज घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. त्याची हालाखीची परिस्थिती होती. आम्हाला वाटले की त्याला माणुसकीच्या नात्याने शूज देणे आवश्यक आहे. लगेच त्याला मी आमच्या कॅन्टीनमधून शूज आणून दिला. त्याचा योग्य तो सन्मान केल्याचे कमाडन्ट विक्रम साळी यांनी सांगितले. वैयक्तिक स्वरुपात शूजची केलेली मदत ही प्राथमिक स्वरूपातील खूप छोटी मदत आहे असेही ते म्हणाले.
एनजीओमार्फत दररोज आम्ही 1000 मुलांची जेवण्याची आणि राहण्याची सोय करतो. SRPF मध्ये येणारा कर्मचारी विशेषत: सामान्य कुटुंबातून येणारा असतो. सामान्य कुटुंबातून आल्यामुळे त्या दिवसाची प्रत्येकाला जाण असते, मला वैयक्तिक आणि अधिकारी कर्मचाऱ्यांना वाटले की त्याला मदत केली पाहिजे.आज आम्ही 15 ते 20 जोड्या शूज आणल्या आहेत. ज्यांना गरज आहे अशा लोकांना दिल्या सुद्धा जेणेकरून त्यांना मदत होईल आणि दुसरं म्हणजे त्यांच्यात उत्साह वाढेल ही भूमिका आहे असेही साळी यांनी सांगितले.
तो व्हिडिओ 60 लाख लोकांनी पाहिला
खरं तर तो व्हिडिओ जाणीवपूर्वक बनवला असे नाही, तो नकळत बनून गेला,हे सुद्धा इंस्टाग्रामवर बघितले तर जवळपास 6 मिलियन लोकांनी तो बघितला आहे. त्याच्यातून पोलिसांबद्दल लोकांच्या मनात एक पॉझिटिव्ह भावना तयार होईल. साहजिकच तो मुलगा सुद्धा भावूक झाला होता, त्याची कोणीतरी दखल घेतली. ही भावना एखाद्या सामान्य विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची असते. शूज जरी प्राथमिक स्वरूपातील भेट असली तरी आम्ही त्याला शूज देऊन त्याचा उत्साह वाढवला आहे असेही ते म्हणाले.
येथे व्हिडीओ पाहा –
माझं स्वप्न मी नक्की पूर्ण करेन
छत्रपती संभाजी नगर गट क्रमांक 14 ला ग्राउंड होतं. घरच्या परिस्थितीमुळे मी सँडल- चप्पलवर धावलो, मी 18 मिनिटांत पाच किलोमीटर आऊट ऑफ ग्राउंड मारलं. माझी मेहनत बघून डीसीपी साळी सरांनी मला शूज गिफ्ट दिले, सरांचा आणि तिथल्या कर्मचाऱ्यांचे आपण खूप आभारी आहोत. असेच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या, माझं स्वप्न मी नक्की पूर्ण करेन असे नितीन याने म्हटले आहे.