ईद-ए-मिलाद मिरवणूकीनिमित्त मुंबईतील वाहतूकीत मोठा बदल, कोणते मार्ग बंद ते पाहा
वाहतुकीबाबतचे हे आदेश २६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १ वाजता लागू होतील आणि मुंबईतील विक्रोळी (पार्कसाईट) येथील आनंदगड नाका येथे ईद-ए-मिलादची मिरवणूक संपेपर्यंत ते अंमलात राहतील.

ईद- ए-मिलाद निमित्ताने मुस्लीम बांधवांची २०,००० ते २५,००० जणांची मिरवणूक उद्या २६ ऑगस्ट रोजी मुंबईत निघणार आहे.या मिरवणूकीत १०० ते १२५ मोटर लॉरी आणि ट्रकचा समावेश असणार असून यामुळे घाटकोपर, कुर्ला आणि विक्रोळीत काही मार्गावरील वाहतूक बंद केली जाणार आहे तर काही मार्गावरील ट्रॅफीक अन्य मार्गाने वळवण्यात आले असल्याचे वाहतूक विभागाने म्हटले आहे.
ईद- ए-मिलाद निमित्ताने निघणाऱ्या या मिरवणूकीची सुरुवात जामा मस्जिद, चिराग नगर, घाटकोपर ( पश्चिम ) येथून दुपारी एक वाजता होणार असून विक्रोळी पश्चिमेकडील पार्कसाईड आनंदगड जंक्शन येथे तिचा समारोप होणार आहे. त्यामुळे या भागातील वाहतूकीवर दुपारी १ वाजल्यापासून निर्बंध येणार आहेत. मिरवणूक सुरु असे पर्यंत हे निर्बंध कायम असणार आहेत.
महत्वाच्या मार्गांवर अवजड वाहनांना बंदी
खाजगी बसेस, एसटी बसेस आणि बेस्ट बसेस सह सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना ( इमर्जन्सी वाहने वगळता ) प्रीमियर जंक्शन, एलबीएस मार्ग, कुर्ला ( पश्चिम ) आणि गांधी नगर जंक्शन, पवई येथे प्रवेश बंदी असणार आहे. अवजड वाहनांची ही बंदी दुपारी एक वाजल्यापासून ईद-ए- मिलाद मिरवणूक संपे असेपर्यंत असणार आहेत.
जीवदया लेन, एम.जी. रोड, घाटकोपर (पश्चिम) आणि ध्रुवराज जंक्शन येथे अवजड वाहनांना असाच निर्बंध लागू होईल, तसेच घाटकोपर पूर्वेकडील हवेली ब्रिजकडून येणाऱ्या वाहनांना किरोल रोड आणि विद्याविहार-विक्रोळी-कामा लेनकडे वळवण्यात येईल.
प्रीमियर जंक्शनवर वाहतुकीत मोठा बदल
कुर्ला येथील एलबीएस (LBS) मार्गावरील प्रीमियर जंक्शन येथे, घाटकोपर आणि विक्रोळीच्या दिशेने जाणारी अवजड वाहने (खाजगी बसेस, एसटी बसेस, बेस्ट बसेस आणि स्वच्छता विभागाची वाहने अडवली जातील. आणीबाणीच्या प्रसंगी अग्निशमन दलाच्या गाड्या, रुग्णवाहिका, शववाहिका, पोलीस वाहने आणि महानगरपालिकेची वाहने यांना या निर्बंधांतून वगळण्यात आले आहे. अधिसूचनेनुसार, प्रीमियर जंक्शनवर अडवलेली वाहने कुर्ला डेपो जंक्शनकडे आणि त्यानंतर सायन-पनवेल-सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड पुलाकडे वळवली जातील.
कामानी जंक्शन परिसरातील वाहतूक बदल
बैल बाजार किंवा सुंदर बाग येथून कामानी जंक्शनकडे येणाऱ्या आणि घाटकोपरच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना कुर्ला (पश्चिम) येथील नौपाडा जंक्शनवर वळवले जाईल. तेथून ही वाहने कुर्ला डेपो जंक्शन आणि त्यानंतर सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड पुलाकडे वळवली जातील. पर्यायी मार्ग म्हणून, वाहने विद्याविहार, किरोळ रोड आणि कुर्ला (पश्चिम) या मार्गांचा वापर करू शकतात.
गांधी नगर जंक्शनजवळील निर्बंध
पवई येथील गांधी नगर जंक्शनकडे जाणाऱ्या आणि एलबीएस मार्गावरून दक्षिणेकडे प्रवास करू इच्छिणाऱ्या अवजड वाहनांसाठी ‘नो-एन्ट्री’ (प्रवेश बंदी) लागू करणारी अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. अशा वाहनांना जेव्हीएलआर (JVLR – जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड) कडे वळवले जाईल.
श्रेयस जंक्शनकडे वाहतूक वळवणे
एलबीएस मार्गावरून श्रेयस जंक्शनकडे जाणाऱ्या अवजड वाहनांवरही निर्बंध असतील. ही वाहने विक्रोळी ट्रॅफिक विभागाजवळील घाटकोपर उड्डाणपुलाखालून ईस्टर्न हायवेकडे वळवली जातील. तसेच, घाटकोपर (पूर्व) येथील सावित्रीबाई फुले जंक्शनवरूनही वाहने पंतनगर आणि घाटकोपर (पूर्व) कडे वळवली जाऊ शकतात.
प्रमुख जंक्शनवर वाहतूक पोलिसांची नियुक्ती
वाहनचालकांना मदत करण्यासाठी आणि वाहतुकीचे नियमन करण्यासाठी मिरवणुकीच्या मार्गावरील जंक्शनवर आणि आसपासच्या परिसरामध्ये वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात केले जातील. वाहतूक पोलिसांनी रहिवासी, वाहनचालक आणि नागरिकांना विनंती केली आहे की त्यांनी अधिकाऱ्यांना सहकार्य करावे आणि मिरवणुकीदरम्यान कुर्ला ते गांधी नगर जंक्शन या दरम्यानच्या एलबीएस मार्गाचा वापर टाळावा. वाहनचालकांना प्रवासाचे नियोजन आगाऊ करण्याचा आणि विलंब टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.