
भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण चांगलंच रंगल्याचं पाहायला मिळत आहे. मी जेव्हा भाजपमध्ये होतो, तेव्हा गिरीश महाजन हे माझे सामान्य कार्यकर्ते होते, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर महाजन यांनी देखील खडसे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं, मी लहाणपणापासूनच संघाचा कार्यकर्ता आहे, खडसे 1990 मध्ये राजकारणात आले, असं महाजन यांनी म्हटलं. त्यावर आता खडसे यांनी पुन्हा एका महाजन यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
नेमकं काय म्हणाले खडसे?
गिरीश महाजन यांचा जन्म सुद्धा झालेला नव्हता, तेव्हापासूनचा इतिहास मला माहिती आहे, 1983 साली मी भाजपात होतो. 1983 ला विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून जे संत संमेलन झालं होतं, त्याला मी उपस्थित होतो. 1883 मधील पुण्यातील संघाच्या शिबिराला सुद्धा मी तीन दिवस पूर्णवेळ उपस्थित होतो. 1990 मध्ये मी काही राजकारणात जन्माला आलो नाही, हे कुणीही संघाचे लोक सांगू शकतील. 1983 मध्ये गिरीश महाजन हे अत्यंत बाल वयात होते, त्यामुळे ते बाल स्वयंसेवक असतील, असा जोरदार टोला खडसे यांनी यावेळी महाजन यांना लगावला आहे.
दरम्यान भाजपमध्ये येण्याची माझी इच्छा होती, मात्र बॉम्बस्फोटामध्ये सहभाग असलेल्या सलीम कुत्ता याच्याबरोबर नाचणाऱ्यांना पक्षात घेतल्यामुळे आता भाजपमध्ये गुंडांच राज्य सुरू होईल, त्यामुळे भाजपची जी प्रतिमा झाली आहे, त्यामुळे माझी भाजपमध्ये जायची आता इच्छा नाही. अशा लोकांसोबत काम करण्याची माझी इच्छा नाही, अशी जोरदार टीका यावेळी एकनाथ खडसे यांनी केली आहे.
दरम्यान महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरू असल्याची चर्चा आहे, यावर देखील एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीमध्ये भाजप असेल, शिवसेना शिंदे गट असेल किंवा अजित दादांचा गट असेल या सर्वांमध्ये एकमेकांबद्दल अविश्वासाचं वातावरण आहे. अजितदादा आम्हाला निधी देत नाही, हे त्यांच्यामधील अविश्वासाचं मूळ आहे, त्यामुळेच त्यांचे आमदार जे आहेत ते नाराजीची भावना व्यक्त करताना दिसत आहेत, असं खडसे यांनी म्हटलं आहे.