फोडाफोडीच्या राजकारणावर एकनाथ शिंदे भडकले, थेट अमित शाहांकडे तक्रार, दिल्लीवारीत नेमकं काय घडलं?

एकनाथ शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन महाराष्ट्र महायुतीतील वाढत्या संघर्षावर चर्चा केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मित्रपक्षांतील नेत्यांना फोडत असल्याचा आणि बंडखोरांना पाठिंबा देत असल्याचा गंभीर आरोप शिंदेंनी केला.

फोडाफोडीच्या राजकारणावर एकनाथ शिंदे भडकले, थेट अमित शाहांकडे तक्रार, दिल्लीवारीत नेमकं काय घडलं?
amit shah eknath shinde
| Updated on: Nov 20, 2025 | 10:26 AM

राज्यात सत्ताधारी शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील अंतर्गत संघर्ष विकोपाला गेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री उशिरा दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदेंनी महायुतीत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदेंनी तब्बल ५० मिनिटे अमित शाह यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. तसेच एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या नाराजीची कारणे थेट केंद्रीय नेतृत्वापुढे मांडली.

यावेळी एकनाथ शिंदेंनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तक्रार अमित शाहांकडे केली. तसेच यावेळी एकनाथ शिंदेंनी रवींद्र चव्हाण यांच्या कार्यशैलीवर तीव्र आक्षेप नोंदवला. रवींद्र चव्हाण यांच्यामुळेच महायुतीत मिठाचा खडा पडत आहे, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले. यासोबतच एकनाथ शिंदेंनी अमित शाहांकडे इतर अनेकही मुद्दे मांडले.

महायुतीच्या उमेदवारांविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या स्थानिक नेत्यांना रवींद्र चव्हाण यांच्याकडून आर्थिक पाठबळ पुरवले जात आहे. भाजपमध्ये मित्र पक्षातील नेत्यांना पक्षप्रवेश देण्यासाठी पैशांचा गैरवापर होत आहे. मित्र पक्षातील नेत्यांना फोडण्याच्या भाजपच्या आक्रमक रणनीतीमुळे युतीधर्म पाळला जात नाही. ही कृती शिवसेनेच्या नेत्यांचे मनोधैर्य खच्चीकरण करणारी आहे, असे एकनाथ शिंदेंनी अमित शाहांना दिलेल्या तक्रारीत म्हटले.

तातडीने हस्तक्षेप करा

भाजपचे पूर्वीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या कार्यकाळात उत्तम समन्वय होता. मात्र चव्हाण यांच्या भूमिकेमुळे महायुतीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रवींद्र चव्हाण यांचे हेच धोरण सुरू राहिल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महत्त्वाच्या निवडणुकीत महायुतीला मोठे राजकीय नुकसान सहन करावे लागेल, अशी भीती एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली. सध्या महायुतीसाठी चांगले वातावरण असताना, काही नेत्यांच्या विधानाने आणि कृतीने हे वातावरण दूषित होत आहे. त्यामुळे, माध्यमांमध्ये बोलताना नेत्यांना संयम राखण्याची समज द्यायला हवी. याबद्दल तत्काळ कृतीची करुन तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी एकनाथ शिंदेंनी केली आहे.

एकनाथ शिंदेंकडून पदाधिकाऱ्यांना दम

दरम्यान डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेच्या ४ नगरसेवकांनी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. या फोडाफोडीच्या राजकारणामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवरही बहिष्कार टाकला होता. आता अमित शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी आपल्या मंत्री आणि पदाधिकाऱ्यांनाही दम भरला आहे. मित्र पक्षातील संभाव्य पक्षप्रवेश थांबवा आणि महायुतीत वितुष्ट येईल असं काम कोणीही करू नये, अशा शब्दात त्यांनी आपल्या मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना तंबी दिली आहे. त्यामुळे आता भाजपचे केंद्रीय नेतृत्व राज्यातील भाजप प्रदेशाध्यक्षांवर कारवाई करणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.