पडद्यामागे खलबतांची मालिका, शिंदे-फडणवीस पुन्हा दिल्ली दौऱ्यावर? महाराष्ट्रात मोठी बातमी घेऊन येणार?

| Updated on: May 24, 2023 | 6:24 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे घडणाऱ्या घडामोडींना सध्या जास्त महत्त्व प्राप्त झालंय. राज्यात आगामी काळात महत्त्वाच्या शहरांमध्ये महापालिका निवडणुकीचा बिगूल वाजण्याची शक्यता आहे. याशिवाय पुढच्याच वर्षी लोकसभा निवडणूक आहे. त्यामुळे सध्या घडणाऱ्या घडामोडी जास्त महत्त्वाच्या आहेत.

पडद्यामागे खलबतांची मालिका, शिंदे-फडणवीस पुन्हा दिल्ली दौऱ्यावर? महाराष्ट्रात मोठी बातमी घेऊन येणार?
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कोणती घडामोड घडेल, याचा काहीच भरोसा नाही. राज्यातील गेल्या काही दिवसांपासूनच्या घडामोडी तर हेच दर्शवत आहेत. बऱ्याच वेळा राजकीय विश्लेषकांचेही अंदाज पूर्णपणे चुकीचे ठरत आहेत. त्यामुळे राज्यातील आगामी काळातलं राजकारण हे कोणत्या दिशेला जाईल, हे आताच सांगणं खूप कठीण आहे. कारण राज्यात आगामी काळात महत्त्वाच्या शहरांमधील महापालिकांच्या निवडणुका पार पडणार आहेत. तसेच पुढच्याच वर्षी लोकसभेची निवडणूक असणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारतं? हा प्रश्न तर फार औत्सुक्याचा आहे. पण आगामी काळातील घडामोडी लक्षात घेता सध्याच्या घडामोडी घडत नाहीयत ना? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. त्यामागील कारणही अगदी तसंच आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतून एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या 27 तारखेला (27 मे) दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

मुख्यमंत्री नीती आयोगाच्या बैठीकाला उपस्थित राहणार

खरंतर मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नीती आयोगाच्या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा दोन दिवसांचा असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे नव्या संसदेच्या उद्घाटनाच्या समारंभालाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

मंत्रिमंडळ विस्तारावर अंतिम शिक्कामोर्तब होणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा दिल्ली दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री आणि उपुख्यमंत्री यांच्या या दिल्ली दौऱ्यात मंत्रिमंडळाच्या विस्तारावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. या दौऱ्या दरम्यान शिंदे-फडणवीस भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेणार असल्याची देखील माहिती मिळत आहे.

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी येणार की…?

राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार हा गेल्या अनेक महिन्यांपासून रखडला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची सत्ताधारी पक्षातील अनेक नेते वाट पाहत आहेत. अनेक जण ताटकळत आहेत. असं असलं तरी मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे. हा विस्तार सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर लगेच होईल, अशी चर्चा होती. पण आता नवीन माहिती समोर आली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी चर्चा समोर आली आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस या दिल्ली दौऱ्यातून मंत्रिमंडळ विस्ताराची मोठी बातमी घेऊन येणार की विस्तार लांबणीवर पडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.