Eknath Shinde : एकनाथ शिंदे प्रचंड संतापले, ‘गुंगी गुडिया’ प्रकरणामुळे काँग्रेसवर हल्लाबोल; थेट माफीची मागणी!
लोकांनी 2024 साली काँग्रेसला त्यांची जागा दाखवली. आज त्यांची देशात, राज्यात काय स्थिती आहे. त्यांचे नेते परदेशात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचा अपमान करतात. देशाची बदनामी करतात, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

Eknath Shinde : काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया खात्यावर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमुळे एकच खळबळ उडाली आहे. या पोस्टमध्ये सुनेत्रा पवार यांचा उल्लेख ‘गुंगी गुडिया‘ असा केलाय. तसेच माजी मंत्री धनंजय मुंडे हे बीडचे हुकूमशाहा आहेत का? असा सवालही काँग्रेसने उपस्थित केलाय. याच एका व्हिडीओ पोस्टमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सत्ताधाऱ्यांकडून काँग्रेसवर सडकून टीका केली जात आहे. काँग्रेसने एका महिलेचा अपमान केल्याचा दावा सत्ताधारी तिन्ही पक्ष करत आहेत. दरम्यान, याच प्रकरणावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलंय. त्यांनी काँग्रेसवर संताप व्यक्त केलाय. ते ‘टीव्ही 9 मराठी’ने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते.
काँग्रेसला लोकांनी घरी बसवलं
काँग्रेसने सुनेत्रा पवार यांचा गुंगी गुडिया असा उल्लेख केला आहे, त्यावर तुमचे मत काय? असा प्रश्न शिंदे यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना जनतेने काँग्रेसला त्यांची जागा दाखवली. काँग्रेसला लोकांनी घरी बसवलं, अशी टीका करत काँग्रेसने हे समजून घ्यावं आणि काँग्रेसने जे विधान केलं आहे, त्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी शिंदे यांनी केली.
अर्थखात्याच्या नावाखाली एका भगिनीचा…
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसने सुनेत्रा पवार यांचा गुंगी गुडिया असा केलेला उल्लेख योग असल्याचे सांगितले आहे. तसेच आपल्याकडे अर्थखातं घेऊन आपण गुंगी गुडिया नसल्याचे सुनेत्रा पवार यांनी सिद्ध करावं, असं आव्हानही त्यांनी दिलंय. यावर बोलताना, अर्थखातं आणि राजकीय विषय हे एका बाजूला ठिक आहे. मुख्यमंत्री आहेत, मी आहे. त्या विषयावर निर्णय घ्यायला आम्ही समर्थ आहोत, असं प्रत्युत्तर शिंदे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना दिले. तसेच अर्थखात्याच्या नावाखाली एका भगिनीचा अपमान करणं हे किती दुर्दैवी आहे. काँग्रेसची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का, असा खरमरीत सवालही शिंदे यांनी हवर्षवर्धन सपकाळ यांना केला.
त्यांचे नेते परदेशात जाऊन…
अशाच लोकांमुळे काँग्रेसची ही स्थिती आहे. लोकांनी 2024 साली काँग्रेसला त्यांची जागा दाखवली. आज त्यांची देशात, राज्यात काय स्थिती आहे. त्यांचे नेते परदेशात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचा अपमान करतात. देशाची बदनामी करतात. आज याच काँग्रेसच्या लोकांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा अपमान केला आहे, त्याबाबत त्यांनी माफी मागावी, अशी मागणीही शिंदे यांनी केली. त्यामुळे आता काँग्रेस नेमकं काय प्रत्युत्तर देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.