सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीची मोठी खेळी; एकनाथ शिंदे यांचे दोन नगरसेवक फोडले, अचानक काय घडलं?
परभणीत एकनाथ शिंदेंना मित्रपक्षाकडून मोठा धक्का बसलाय. पाथरीतील 2 नगरसेवकांनी राष्ट्रवादीची वाट धरली. यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय.

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असताना सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीने एकनाथ शिंदेंना मोठा धक्का दिला आहे. परभणीत एकनाथ शिंदे यांच्या दोन नगरसेवकांनी सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीची वाट धरली आहे. दोन नगरसेवकांच्या भूमिकेने परभणीतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दोन्ही नगरसेवकांच्या निर्णयाची जोरदार चर्चा होत आहे. त्यांनी शिंदे गटातील अंतर्गत वादाला कंटाळून राष्ट्रवादीला साथ देण्याचा निर्णय घेतला.
परभणीच्या पाथरी नगरपरिषदेत शिंदे गटाला अंतर्गत वादाचा मोठा फटका बसल्याचे समोर आलं आहे. पाथरी नगरपरिषदेमधील दोन नगरसेवकांनी अंतर्गत वादाला कंटाळून राजीनामा दिलाय. आता या दोन्ही नेत्यांचा लवकरच आमदार राजेश विटेकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. आलम तरन्नून बेगम मुजीब आणि पठाण हसीब खान तहजीब खान अशी राजीनामा दिलेल्या दोन नगरसेवकांची नावे आहेत. या घटनेनंतर परभणीत राजकीय घडामोडीना वेग आला आहे.
पाथरी नगरपरिषदेत नगराध्यक्षांसह शिंदे गटाचे 9 नगरसेवक निवडून आले होते. त्यातील दोन नगरसेवकांनी वेगळा निर्णय घेतलाय. नगराध्यक्ष आसिफ खान यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत दोन नगरसेवकांनी राजीनामा दिला. पठाण हसीब खान तहजीब खान आणि आलम तरन्नुम बेगम मुजीब हे प्रभाग क्रमांक ७ ब मधून निवडून आले होते. या दोन्ही नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची कार्यालयात जाऊन भेट घेतली. त्यानंतर त्यांच्या नगरसेवक पदाचा राजीनामा सादर केला. राजीनामा दिल्याने आता दोन्ही नेते आता शिंदे गटाचे सदस्य म्हणूनही पुढे काम करणार नसल्याचे सपष्ट केले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी जालन्यातही एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला. त्यांच्या दौऱ्याआधी जालन्यातील मंठा परतू विधानसभा मतदारसंघातील तालुका प्रमुखांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी सामूहिकरित्या राजीनामा दिला. जिल्हाप्रमुख आसाराम बोराडे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज अनेक पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत राजीनामा दिलाय. आसाराम बोराडे हे पदाधिकाऱ्यांना डावलत पक्षाचे सर्व कार्यक्रम करत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. आता जालन्यानंतर परभणीत एकनाथ शिंदेंना धक्का बसल्याने त्यांच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.