एकनाथ शिंदेंचा सुनेत्रा पवारांना मोठा धक्का! तटकरेंच्या दोन्ही बालेकिल्यांना खिंडार, विश्वासू सहकाऱ्याने साथ सोडली

एकनाथ शिंदे यांनी सुनेत्रा पवारांना मोठा धक्का दिला आहे. तटकरेंच्या दोन्ही बालेकिल्ल्यांना शिंदे गटाने हादरा दिला आहे. तटकरेंच्या विश्वासू सहकाऱ्याने साथ सोडली आहे.

एकनाथ शिंदेंचा सुनेत्रा पवारांना मोठा धक्का! तटकरेंच्या दोन्ही बालेकिल्यांना खिंडार, विश्वासू सहकाऱ्याने साथ सोडली
sunetra pawar raigad
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 15, 2026 | 2:02 PM

रायगडच्या राजकारणात सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीतील सुनील तटकरेंना मोठा धक्का बसला आहे. सुनील तटकरे यांचे बालेकिल्ले समजल्या जाणाऱ्या माणगाव आणि श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादीला मोठी गळती लागल्याचे समोर आलं आहे. माणगावात सुनील तटकरेंच्या विश्वासू सहकाऱ्यासह अनेक कार्यकर्ते, काही माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. तर श्रीवर्धनमध्ये शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलीये. पालकमंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत भव्य पक्षप्रवेश पार पडलाय. त्यामुळे तटकरेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची ताकद वाढत आहे. रायगडच्या या राजकीय वर्तुळात या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा रंगली आहे.

या राजकीय पक्षप्रवेशामुळे रायगडच्या राजकारणात पुन्हा एकदा तटकरे विरुद्ध दळवी असा संघर्ष पेटलाय. या पक्षप्रवेश सोहळ्यात आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यावर थेट निशाणा साधला. त्यांनी तटकरेंवर गंभीर आरोप केले. तटकरे आणि आताच्या नेतृत्वात जमीन-अस्मानाचा फरक अशल्याचा टोला लगावला. राष्ट्रवादीच्या माध्यमातून निधी आला होता. त्यातील ७० टक्के निधी चोरीला गेल्याचा गंभीर आरोप दळवींनी केला. इतकंच नव्हे, तर २४ हजार कोटी आणि ७० हजार कोटींच्या हिशोबाचा मुद्दा उपस्थित करत तटकरे कुटुंबावरही निशाणा साधला. तटकरे कुटुंबामुळे जिल्ह्याचं नुकसान झालं. त्यांनी स्वतःच्या कुटुंबाची भरभराट केल्याची जहरी टीका दळवींनी केली. जन्माला येतानाच गेला असता तर वारभर कपड्यात गेला असता, अशी जहरी टीका देखील दळवींनी तटकरे यांच्यावर केली. दर्शन विचारे यांना दिलेल्या आश्वासनांवरूनही प्रश्न उपस्थित केले.  श्रीवर्धनच्या विकासासाठी पालकमंत्री भरत गोगावले यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार असल्याचे दळवींनी स्पष्ट केले.

Loading...

दळवींच्या टीकेला तटकरेंचा पलटवार 

आमदार महेंद्र दळवी यांनी केलेल्या टीकेला सुनील तटकरे यांनी जोरदार पलटवार केला. ‘बाप रे! त्यांना क्षमा करा. पांडुरंगाने त्यांना क्षमा करावी.तटकरे कुटुंबाला विरोध असेल तर असू द्या. पण जनतेची सेवा अखंड सुरूच राहणार आहे. श्रीवर्धन राष्ट्रवादीचा अभेद्य बालेकिल्ला आहे. आजही, उद्याही १००० टक्के कायम राहणार आहे. माझं काम बोलतं, मतदारांना कोणी गृहीत धरू नये’, असा सूचक इशारा सुनील तटकरेंनी दिला.

‘राजकारणात आरोप-प्रत्यारोप होतच असतात. रायगडच्या विकासासाठी आम्ही सातत्याने काम केले. कोण काय बोलतं यापेक्षा जनतेचा विश्वास महत्त्वाचा आहे. महायुतीमध्ये मतभेद असू शकतात. मात्र विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येण्याची आमची भूमिका कायम आहे. पक्षप्रवेश आणि राजकीय समीकरणांवर भाष्य करण्यापेक्षा आगामी काळात जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us