जळगाव जिल्हा बँकेत महायुतीतच जुंपली! रक्षा खडसेंना स्वकीयांचंच आव्हान; चंद्रकांत पाटलांचा थेट इशारा, म्हणाले…

Jalgaon District Bank Election News: जळगाव जिल्हा बँकेत महायुतीतच जुंपल्याचे दिसून आले आहे. रक्षा खडसेंविरोधात शिंदेसेनेचे उमेदवार मैदानात उतरले आहेत.

जळगाव जिल्हा बँकेत महायुतीतच जुंपली! रक्षा खडसेंना स्वकीयांचंच आव्हान; चंद्रकांत पाटलांचा थेट इशारा, म्हणाले...
| Updated on: Oct 30, 2026 | 5:47 PM

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या मंत्री रक्षा खडसे यांना एकनाथ शिंदे शिवसेनेकडूनच आव्हान देण्यात आले आहे. मुक्ताईनगर तालुक्यात रक्षा खडसे यांच्याविरुद्ध शिवसेना शिंदे गटाकडून कार्यकर्त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. माझ्याविरुद्ध तर कोणी निवडणूक लढवेल तर मी त्याला कसं काय लढू देईन. महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला तर मी काय करू, या शब्दात शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या मंत्री रक्षा खडसे यांना आव्हान दिले आहे.

मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांचे आदेश आले तर अर्ज मागे देखील घेऊ. रक्षा खडसेंचा प्रचार करू, असे देखील आमदार चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीच्या ३ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. बिनविरोध झालेल्या जागांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या दोन, भाजपच्या एका जागेचा समावेश आहे. पारोळा, एरंडोल आणि भुसावळ विकासो मतदारसंघांत इतर कोणताही उमेदवारी अर्ज दाखल नाही.

Loading...

पारोळ्यातून शिवसेनेच्या नलिनी चिमणराव पाटील, एरंडोलमधून मृणाल अमोल पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल पाटील यांच्या आई आणि पत्नी जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोध निवडून आल्या आहेत. भुसावळमधून भाजपच्या मंत्री संजय सावकारे यांची पत्नी रजनी संजय सावकारे यांची बिनविरोध निवड केली आहे. जिल्हा बँक निवडणुकीत आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तसेच मतदानापूर्वीच तीन जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.

तर याआधी जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये जागा वाटपावरून तिढा निर्माण झाला होता. राष्ट्रवादीसोबत जागावाटपाचे सूत्र ठरलं होतं. मात्र शिवसेनेच्या जागा संदर्भात भाजपकडून अनिश्चितता होती. भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी यासंदर्भात माहिती दिली होती. खबरदारी म्हणून सर्वच जागांवर भाजपकडून आणि शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.

महायुतीची बैठक मात्र बैठकीत काही जागांवर शिवसेना आणि भाजपमध्ये तिढा दिसून आला होता. शिवसेना शिंदे गटाकडून जास्त जागांची मागणी असल्याने तिढा असल्याची आमदार मंगेश चव्हाण यांनी माहिती दिली होती. जागा वाटपाबरोबरच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचा फॉर्म्युला ठरला नसून भाजप शिवसेनेत तिढा आहे. मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यासंदर्भातला निर्णय घेतील, अशी देखील आमदार मंगेश चव्हाण यांनी माहिती दिली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us