एक व्यक्ती रोज यायची, मधुबालाच्या कबरीजवळ तास न् तास बसून ढसाढसा रडायची… हा किस्सा काळीज हादरवून सोडेल
अभिनेत्री मधुबालाच्या निधनानंतर तिच्या वडिलांवर दु:खाचा डोंगरच कोसळला होता. लाडकी लेक गेल्याने ते कोलमडून गेले होते. इतके की मुलीच्या आठवणीत ते रोज तिच्या कबरीपाशी जाऊन तास न् तास ढसाढसा रडायचे. स्वतः अनेक आजारांनी ग्रासलेले असूनही अनेक वर्षे त्यांनी हे दुःख मनात साठवले.

बॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री मधुबाला अजूनही तिच्या चाहत्यांच्या स्मरणातून जात नाही. तिचं सौंदर्य, हास्य, अभिनय आणि दिलीप कुमार यांच्यासोबतची अधुरी प्रेम कहाणी… यामुळे मधुबाला विस्मरणातून जाणं अशक्यच. मधुबाला अत्यंत कमी वयात गेली. पण तिने दीर्घकाळापर्यंत बॉलिवूडवर छाप सोडली. आजही मधुबालाचे किस्से ऐकवले जातात. आजही तिचे सिनेमे पाहिले जातात. इतकं प्रेम तिच्यावर तिच्या चाहत्यांनी केलंय. तिच्याशी संबंधित असाच एक किस्सा समोर आला आहे. हा किस्सा ऐकल्यावर प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
मधुबालाची बहीण मधुर भूषण यांनी एका पॉडकास्टला मुलाखत देताना मधुबालाच्या आठवणींना उजाळा दिला. मधुबाला गेल्यानंतर त्यांचे वडील अताउल्लाह खान यांचे काय हाल झाले होते? ते अनेक वर्ष कसे मुलीच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडायचे, या सर्व गोष्टी मधुर भूषण यांनी सांगितल्या आहेत. आमचे वडील कठोर शिस्तीचे होते. पण मुलांवर प्रचंड प्रेम करायचे. मधुबाला गेल्याने ते हादरून गेले होते. ते स्वत: अनेक गंभीर आजारांचा सामना करत होते. त्यांनी तीन वेळा हार्ट अटॅक आला होता. ब्रेन स्ट्रोक झाला होता. त्याशिवाय त्यांना डायबिटीज होता. असं असूनही मधुबालाच्या कबरीवर जायचं त्यांनी कधी बंद केलं नाही, असं मधुर भूषण यांनी सांगितलं. माझे वडील मधुबालाच्या कबरीवर रोज जायचे. कबरीच्या बाजूला एक खुर्ची टाकून तिथे बसायचे आणि धायमोकलून रडायचे. अनेक वर्ष ते आपल्या लाडक्या लेकीसाठी कब्रस्तानात येत होते, असं त्या म्हणाल्या.
कबरीत अत्तरच अत्तर
मधुर यांनी अजून एक किस्सा सांगितला. त्यावरून वडील आणि लेकीचं किती अतूट नातं होतं हे दिसून येतं. मधुबालाला दफन करताना वडिलांनी कबरीमध्ये एवढं अत्तर टाकलं की संपूर्ण कब्रस्तानात महिनाभर अत्तराचा वास येत होता. त्यांनी कबरीच्या आत आणि मधुबालाच्या पार्थिवावरही भरपूर अत्तर ओतलं होतं. मुस्लिमांमध्ये दफन करताना असं करत नाहीत. पण तरीही माझ्या वडिलांना हे करण्याची परवानगी कशी मिळाली? त्यांनी हे कसं केलं? आणि त्यांना हे कसं सूचलं हे देवालाच माहीत, असं त्या म्हणाल्या.
मकबरा बनवला
वडिलांनी मधुबालाची कबर अत्यंत खास पद्धतीने बनवली होती. कबरीला वरूनच नव्हे तर कबरीचा किनाऱ्याचा भागही त्यांनी संगमरवरने झाकला होता. सामान्यपणे कबरीचा मधला भाग रिकामा सोडला जातो. पण वडिलांनी हा संपूर्ण भाग संगमरवरणे झाकून टाकला होता. जणू काही ही कबर एक छोटा मकबराच वाटत होती, असंही त्यांनी सांगितलं.
वडिलांच्या मृत्यूनंतर हा संगमरवरचा ढाचा तोडून टाकण्यात आला. जेव्हा आम्हाला या गोष्टीची माहिती मिळाली तेव्हा आम्हाला धक्काच बसला. आम्हाला वाटलं आता मधुबालाच्या कबरीची काहीच निशाणी राहिली नाही. पण कुणी तरी आम्हाला मधुबालाची कबर जैसे थे असल्याचं सांगितलं. जेव्हा आम्ही तिथे गेलो तेव्हा तिथे आम्हाला कबर दिसली. त्यावर मधुबाला असं लिहिलेलं होतं. त्यामुळे आम्हाला थोडसं हायसं वाटलं, असंही त्यांनी सांगितलं.
तिथेच दिलीप कुमार यांची कबर
याच कब्रस्तानात बॉलिवूडच्या अनेक कलाकारांची कबर आहे. दिलीप कुमार, परवीन बॉबी, मोहम्मद रफी आणि नौशाद आदी असंख्य कलाकारांची कबर तिथेच आहे. मधुबालाच्या कबरीपासून पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावर दिलीप कुमार यांची कबर असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
