मोठी बातमी ! पुस्तक प्रकाशनापूर्वीच संजय राऊत यांचा मोठा दावा, या व्यक्तीबाबत केला मोठा गौप्यस्फोट
संजय राऊत यांनी 'बोध कीर्तन' पुस्तक प्रकाशनापूर्वी विजय माल्याबाबत मोठा दावा केला. माल्याला 'भगोडा' म्हणणे चुकीचे असून, सरकारने त्याला सवलत का दिली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. इतर अनेक उद्योगपतींचे कर्ज माफ झाले, पण माल्यालाच लक्ष्य का, असा प्रश्न राऊत यांनी विचारला.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘बोध कीर्तन’ या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. त्यापूर्वीच राऊत यांनी एक मोठा दावा केला आहे. उद्योगपती विजय माल्या याला लोक भगोडा म्हणतात. मला ते पटत नाही. कुणाला आपला देश सोडून जावसं वाटेल? कुणाला नाही वाटणार, असं मोठं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. इतर उद्योगपतींचे कर्ज माफ केले जातात. मग माल्याला थोडी सवलत का दिली नाही? केवळ सरकारचा मित्र नसल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली का? असा सवालही राऊत यांनी विचारला आहे. टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी हा सवाल केला आहे.
विजय माल्या उद्योगपती होता. त्याने देशाच्या तिजोरीत सातत्याने कररुपाने भर घातला. मी त्यांना ओळखतो. त्यांच्यासोबत अनेकदा जेवलो आणि बसलो आहे. ते पार्लमेंटला होते. ज्या परिस्थितीत त्यांना देश सोडावा लागला, त्याचा विचार सर्वांनी केला पाहिजे. जगात अनेक उद्योगपतींवर असे प्रसंग आले. दक्षिण सुदानमध्ये एक उद्योगपती आहे. त्यांचे नाव लॉरेन्स लॉल आहे. त्यांची गोष्ट यात आहे. ते माल्याप्रमाणेच आहेत. असंख्य उद्योगपती या देशात आहेत. ज्यांचे लाखो कोटींचे कर्ज माफ करण्यात आले आहे. बँकांचे कर्ज माफ केले आहे, असं संजय राऊत म्हणाले.
ते सरकारचे मित्र नव्हते
माझ्या माहितीनुसार, विजय माल्या याने जे कर्ज घेतलं त्यापेक्षा अधिक व्याज भरलं आहे. तरीही त्यांना सवलत दिली नाही. ज्यांनी 50 हजार कोटींची कर्ज घेतले. ते फक्त सरकारचे मित्र आहेत म्हणून त्यांना कर्जमाफी दिली. शेतकऱ्यांनाही अशी कर्ज माफी मिळत नाही. बँकांनी उद्योगपतींशी चर्चा करून कशा प्रकारे पैसे वसूल करू शकतो हे पाहिलं पाहिजे. माल्याची संपत्ती जप्त केली. ती संपत्ती कर्जाच्या रकमेपेक्षा अधिक आहे. त्यामुळे तुमची कर्ज माफी झाली आहे. त्यांनी जवळ जवळ अडीच हजार कोटींचा भरणा केला आहे. त्यांना पुढची रक्कम भरायची होती. सवलत हवी होती. पण तुम्हाला एखाद्या उद्योगपतीचा उद्योग बंदच पाडायचा असेल, गिळायचा असेल. तो या देशात राहूच नये अशी परिस्थिती निर्माण करायची असेल तर काय करणार? जेट उद्योग समूह बंद पाडला. किंगफिशर बंद झाली. देश सोडून जायला भाग पाडलं. कारण ते सरकारचे मित्र नव्हते, अशी टीका राऊत यांनी केली.
लेखक, पत्रकार हीच ओळख राहावी
‘बोध कीर्तन’ या पुस्तकात काय काय आहे? यावर राऊत यांनी भाष्य केलं. मी सतत लिखाण करत आलो आहे. खासदार, राजकारणी, नेता यापेक्षा लेखक आणि पत्रकार अशीच माझी शेवटपर्यंत ओळख राहावी ही माझी इच्छा असते, म्हणून मी लिहित असतो. हे माझं 17 वं पुस्तक आहे. हे पुस्तक अराजकीय आहे. त्यात राजकारण कमी आहे. संदर्भ कमी आहे. राजकीय टीका, टिप्पणी कमी आहे. यात कविता आहे. लहान कथा आहेत, सुविचार आहे, केस स्टडी आहे, मनातील उद्रेक, असंतोष, भावना आहे. तत्त्वज्ञान आहे. आपल्या आवडणाऱ्या व्यक्तिंबद्दल लिहिलं आहे. युद्ध, संवाद आणि आपल्या आवती भोवती जे घडलं ते या पुस्तकात आहे, असं त्यांनी सांगितलं.
कीर्तनातून बोध मिळतो
या पुस्तकाचं तुम्ही कोणतंही पान उघडून वाचू शकता. लहान लहान प्रकरणं आहेत. काही प्रकरणं एका ओळीचं आहे, काही दोन ओळीचे आहेत. लोकांना बोध मिळावा आणि त्यांनी आनंदही घ्यावा, हा त्या मागचा हेतू आहे. कीर्तनातून बोध मिळतो. आनंद मिळतो. तसं सर्व या पुस्तकात आहे, असं ते म्हणाले.
