Anjali Damania on Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांचे भोंदू खरातांसोबत नवे फोटो समोर, अंजली दमानिया आक्रमक

भोंदू बाबा अशोक खरात याला लैंगिक शोषण आणि छळाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याच्या घरातून शस्त्रे, काडतुसे जप्त झाली असून, त्याचे राजकारण्यांशी, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी असलेले संबंध समोर आले आहेत. यात रुपाली चाकणकर यांचे खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्याने त्या टीकेच्या धनी ठरल्या. अंजली दमानिया यांनी चाकणकरांच्या पदावरुन हकालपट्टीची मागणी केली आहे, ज्यामुळे हे प्रकरण अधिकच चिघळले आहे.

Anjali Damania on Rupali Chakankar :  रुपाली चाकणकरांचे भोंदू खरातांसोबत नवे फोटो समोर, अंजली दमानिया आक्रमक
अंजली दमानियांनी शेअर केले चाकणकरांचे फोटो
Image Credit source: social media
| Updated on: Mar 20, 2026 | 9:50 AM

भोंदू बाबा अशोक खरात याच्यावर लैंगिक छळाचे, शोषणाचे आरोप करण्यात आले असून त्याला बेड्या ठोकून अटक करण्यात आली. न्यायालयाने अशोक खरातला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. खरात याच्या घरावर छापा मारण्यात आला. त्याच्या घरातून पिस्तुल, जिवंत काडतुसं तसेच काही व्हिडीओही जप्त करण्यात आले आहेत. दिवसेंदिवस त्याचे नवनवे कारनामे उघड होत असून एनसीपीचे नेते, राजकारणी, प्रशाकीय अधिकाऱ्यांशीही त्याचे संबंध असल्याचे समोर आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचाही त्यात समावेश होता. त्या खरात यांच्या शिष्या होत्या, त्यांनी त्यांचे पाद्यपूजन करताना, त्यांच्या डोक्यावर छत्री धरतानाचे असे अनेक फोटो, तसचे व्हिडीओ यापूर्वी समोर आले होते. सोशल मीडियावर बरेच व्हायरलही झाल्यानतर रुपाली चाकणकर या टीकेच्या धनी ठरल्या होत्या. त्यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यात करण्यात आली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी तर चाकणकर यांना लक्ष्य करत टीकाही केली होती.

अंजली दमानिया आक्रमक

तर आता याच मुद्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या देखील आक्रमक झाल्या असून त्यांनी रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे काही नवे फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत. तसेच त्यांनी यासोबत एक पोस्टही लिहीली आहे. अशा Epstein बाबांवर इतकी मेहेरबानी ? ह्या महिला आयोगाच्या अध्यक्षा ? ह्या रुपाली चाकणकरांची तत्काळ पदावरून हकालपट्टी करा, अशा शब्दांत अंजली दमानिया यांनी हल्ला चढवला आहे.

अंजली दमानियांनी 4 फोटो शेअर केले असून त्यात एकामध्ये अशोक खरात हे चाकणरांना केक भरवताना दिसत आहेत. तर दुसऱ्या एका फोटोत चाकणकर या खरात यांचा हात पकडताना, पुढे त्या त्यांच्या पाया पडताना दिसत आहेत. दमानिया यांच्या या फोटोंनी नवी खळबळ माजली आहे. दमानिया यांनी चाकणकरांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.

दरम्यान खरात यांच्याप्रकरणात रोज नवनवी माहिती उघड होत आहे. अनेक दिग्गज नेते कॅप्टन खरातच्या दारात आल्याचेही उघड झाले. अमित शाह, मिलिंद नार्वेकर यांचे देखील कॅप्टन खरात सोबतचे फोटो व्हायरल झालेत. अमित शहा यांच्या कुटुंबातील लोकांनी देखील कॅप्टन खरातची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे, एवढंच नव्हे तर नेते, अभिनेते सगळेच कॅप्टनचे भक्त असल्याचं उघड झालंय. तसेच एनसीपीच्या दोन्ही गटांतील नेते हे कॅप्टनचे भक्त असल्याचे समोर आले.

 

Follow Us