बळीराजा संकटात! कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकरी आक्रमक, परभणीत रास्ता रोको

गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे बळीराजा अडचणीत आला आहे. असं असताना परभणी जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी आक्रमक झाला आहे.

बळीराजा संकटात! कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकरी आक्रमक, परभणीत रास्ता रोको
बळीराजा संकटात! कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकरी आक्रमक, परभणीत रास्ता रोको
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Sep 08, 2026 | 3:28 PM

यंदा पावसाने जोरदार सुरूवात केली मात्र त्यानंतर दडी मारल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. परभणी जिल्ह्यातील खरीप पिके अडचणीत आले आहेत. सोयाबीनचं पिक करपून गेलं आहे. सोयाबीनचे पीक डोळ्यादेखत जळून गेले आहे. त्यामुळे जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. सुकलेल्या पिकांचे पंचनामे करून मदत द्यावी, या मागणीसाठी परभणीतील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. याच पार्श्वभूमीवर संतप्त शेतकऱ्यांनी वाळून गेलेले सोयाबीन रस्त्यावर फेकून पूर्णा-नांदेड राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. शेतातील वाळलेले सोयाबीन उपटून आणले आणि ते थेट मुख्य रस्त्यावर फेकून निषेध व्यक्त केला.

परभणीत सोयाबीन उत्पादक शेतकरी आक्रमक

“शासनाने परभणी जिल्ह्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि पिकांचे पंचनामे करून हेक्टरी मदत द्यावी,” अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केली. या आंदोलनामुळे पूर्णा-नांदेड राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी शेतकऱ्यांना बाजूला होण्याचे आवाहन केले, मात्र शेतकरी मागण्यांवर ठाम असल्याने पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक उडाली. परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याचं पाहून पोलिसांनी आंदोलकांना जबरदस्तीने हटवण्यास सुरुवात केली. यावेळी आंदोलन करणाऱ्या एका शेतकऱ्याला पोलिसांनी रस्त्यावरून थेट फरपटत नेल्याचा प्रकार समोर आल्याने संताप व्यक्त आहे..

अमरावतीतही आंदोलन

अमरावतीतही बळीराजा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाला. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर डेरा आंदोलन करण्यात आलं. यावेळी सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करावा तसेच सरसकट शेतकऱ्यांची कुठली अटी व शर्ती न ठेवता कर्जमाफी करावी, अशी मागणी करण्यात आली. दुष्काळामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत करावी, असंही त्यांनी सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us