सासरे आणि सूनबाईही निघाल्या शिंदे गटात? उद्धव ठाकरे पहातच राहणार, कॉंग्रेसलाही ‘दे’ धक्का?

उद्धव ठाकरे गटानंतर मुख्य्म्नात्री एकनाथ शिंदे यांनी आता आपले लक्ष कॉंग्रेसवर केंद्रित केले आहे. मुंबई महापालिकेत संख्याबळ वाढविण्यासाठी शिंदे गटाने मोठी तयारी केली आहे. आगामी काळात राष्ट्रवादी आणि कॉंग्रसचे अनेक नगरसेवक शिवसेनेत येणार आहेत.

सासरे आणि सूनबाईही निघाल्या शिंदे गटात? उद्धव ठाकरे पहातच राहणार, कॉंग्रेसलाही दे धक्का?
TUKARAM KATE AND CM EKNATH SHINDE
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Aug 26, 2023 | 8:06 PM

मुंबई : 26 ऑगस्ट 2024 | उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे माजी आमदार, माजी नगरसेवक, पदाधिकारी येणाऱ्यांचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यानंतर उद्धव ठकारे यांनी बेकायदेशीर सरकार अशी संभावना केली. हे सरकार लवकरच कोसळणार, असा दावाही त्यांनी केला होता. मात्र, शिंदे सरकारचे एक वर्ष पूर्ण झाले. शिवाय त्यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीचे अजित पवार हे देखील सामील झाले. त्यामुळे हे सरकार अधिकच भक्कम झाले. परिणामी आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले मुंबईतील पदाधिकारी, माजी आमदार, नगरसेवक हे शिंदे गटात प्रवेश करत आहेत.

मुंबईचे चेंबुरचे माजी आमदार तुकाराम काते आणि त्यांची सून माजी नगरसेविका समृद्धी काते या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पक्षात ज्येष्ठ असूनही नगरसेवक राहुल शेवाळे यांना पक्षाने खासदारकीची उमेदवारी दिली. त्यामधूनच चेंबूरमध्ये शेवाळे विरुद्ध काते असा संघर्ष निर्माण झाला होता.

२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने काते यांना डावलून प्रकाश फातर्पेकर यांना उमेदवारी दिली. तेव्हापासून काते पक्षावर नाराज होते. अखेर त्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचाह निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्यासोबत त्यांच्या स्नुषा माजी नगरसेविका समृद्धी काते या देखील शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

कॉंग्रेसलाही ‘दे’ धक्का

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गिरीश महाजन यांच्या 20 पिढ्या आल्या तरी कॉंग्रेस पक्ष फुटणार नाही असे विधान केले आहे. मात्र, कॉंग्रेस पक्ष फुटीरतेच्या मार्गावर आहे. मुंबई महानगरपालिकेतील किमान दहा नगरसेवक लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत अशी माहिती या सूत्रांनी दिली.

भोईवाडा येथील कॉंग्रस नगरसेवक सुनील मोरे यांनी या आधीच शिंदे गटात प्रवेश केला आहे. तर, आज वडाळा येथील नगरसेविका पुष्पा कोळी यांनी कॉंग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून शिवसेनेत प्रवेश केला. सुनील मोरे, पुष्पा कोळी यांच्यानंतर आणखी आठ नगरसेवक पक्षाला सोडचिट्ठी देण्याच्या तयारीत आहेत.

कॉंग्रेसचे महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा, धारावी येथील माजी नगरसेवक बब्बू खान, कुणाल माने, सोफियान वणू, राजेंद्र नरवणकर हे देखील शिवसेनेच्या मार्गावर आहेत अशी माहिती या सूत्रांनी दिली.