आधी पंतप्रधान मोदींची भेट घेतली, आता राष्ट्रवादीच्या खासदारांची शरद पवारांसोबत महत्त्वाची बैठक, राजकारणात मोठं काही तरी घडणार?
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती, या भेटीनंतर आता खासदारांनी शरद पवार यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडली आहे.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदारांनी सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली, मात्र आता मोदी यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटात घडामोडींना वेग आला आहे. या खासदारांची आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बैठक पार पडली आहे. सध्या स्थितीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे एकूण खासदारांची संख्या 8 आहे, त्यापैकी सात खासदार या बैठकीला उपस्थित होते. खासदार बाळ्यामामा म्हात्रे वगळता सर्व खासदारांनी या बैठकीला हजेरी लावली. दरम्यान या सर्व खासदारांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती, या भेटीनंतर लगेचच शरद पवार यांच्यासोबत ही बैठक झाल्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राष्ट्रवादीच्या खासदारांची ही बैठक पार पडली आहे. रेवती सुळे यांच्या लग्नाच्या रिस्पेशनला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे बडे नेते हे शरद पवार यांच्या ६ जनपथ निवासस्थानी उपस्थित होते. त्यानंतर शरद पवार यांच्या निवासस्थानी होत असलेल्या या बैठकीला वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे. या बैठकीला राष्ट्रवादी शरद पवार गटातील आठपैकी सात खासदार उपस्थित होते.
दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गट एनडीएसोबत जाण्याची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती, त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. दरम्यान त्यानंतर पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या आठही खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती, त्यानंतर आता त्यांनी शरद पवार यांची देखील भेट घेतली आहे.