भुजबळांचा धूमधडाका…पुरवणी अर्थसंकल्पात येवल्यासाठी 20 कोटी; 15 तलाठी इमारतींसाठी 4 कोटी 50 लाख मंजूर

| Updated on: Dec 26, 2021 | 11:15 AM

नाशिक जिल्ह्यातील उंदीरवाडी, लहीत, सायगाव, बोकटे, डोंगरगाव, भारम, धामोडे, कूसमाडी, कुसूर, राजापूर, देवठाण, तळवाडे, वाईबोथी,अंदरसूल व नगरसूल येथील तलाठी कार्यालयांच्या इमारती नव्या होणार आहेत.

भुजबळांचा धूमधडाका...पुरवणी अर्थसंकल्पात येवल्यासाठी 20 कोटी; 15 तलाठी इमारतींसाठी 4 कोटी 50 लाख मंजूर
chhagan bhujbal
Follow us on

नाशिकः पालकमंत्री आणि राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहकमंत्री छगन भुजबळांनी येवल्यातील कामांसाठी निधी ओढून आणण्याचा अक्षरशः धडाका लावला आहे. आता पुन्हा एकदा पुरवणी अर्थसंकल्पात येवला मतदार संघातील कामांसाठी 20 कोटी 30 लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे, तर 15 तलाठी कार्यालयांच्या इमारतींसाठी 4 कोटी 50 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे येवलेकरांमध्ये आनंद आहे.

येथे होणार कामे…

हिवाळी अधिवेशनातील पुरवणी अर्थसंकल्पात येवला मतदारसंघातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असलेल्या तीन प्रमुख रस्ते व एका पुलाच्या कामांसाठी 20 कोटी 30 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये येवला, नागडे, धामणगाव, भारम, वाघाळे ते 752 जी रस्ता राज्य महामार्ग 412 किमी 1/600 ते 7/200 व 7/800 ते 9/700 मध्ये मजबुतीकरण करण्यासाठी 4 कोटी, नाशिक निफाड, येवला, वैजापूर, औरंगाबाद, प्रमुख राज्य मार्ग 2 सा.क्र. 198/800 ते 199/500 मधील विंचूर गावातून जाणाऱ्या लांबीचे कॉंक्रीटीकरण करण्यासाठी 6 कोटी, वापी,पेठ,नाशिक,निफाड, येवला, वैजापूर औरंगाबाद, जालना प्रमुख राज्य मार्ग 2 सा.क्र. 211/500 ते 212/00, 214/00 ते 295/00, 216/425 ते 218/00 या रस्त्याच्या कामासाठी 2 कोटी 80 लक्ष रुपये निधी तर नाशिक, निफाड, येवला, वैजापूर औरंगाबाद या प्रमुख राज्य मार्ग 2 या रस्त्यावर गोई नदीवरील सा.क्र. 209/100 मध्ये मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी 7 कोटी 50 लाख रुपये निधीस मंजुरी देण्यात आलेली आहे. सदर कामांना लवकरच सुरवात होणार असून नागरिकांना दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होणार आहे.

या तलाठी कार्यालयांना इमारती

येवला मतदार संघातील 15 तलाठी कार्यालयांच्या नवीन इमारत बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली असून, यासाठी 4 कोटी 50 लाख रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. तर इतरही मंडळ व तलाठी कार्यालयाच्या नूतन इमारतीसाठी मंत्री छगन भुजबळ यांचा पाठपुरावा सुरू असून, लवकरच इतर कार्यालयांच्या बांधकामाचा प्रश्न मार्गी लागेल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. राज्य शासनाकडून येवला मतदारसंघात एकूण पंधरा तलाठी कार्यालयांच्या नवीन इमारत बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. मुख्य लेखाशीर्ष 4059 व 0799 योजनेअंतर्गत विविध महसुली कार्यालये व निवासस्थाने तथा इतर अनुषंगिक कामे या योजनेतून राज्य शासनाकडून प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. यामध्ये उंदीरवाडी, लहीत, सायगाव, बोकटे, डोंगरगाव, भारम, धामोडे, कूसमाडी, कुसूर, राजापूर, देवठाण, तळवाडे, वाईबोथी,अंदरसूल व नगरसूल येथील तलाठी कार्यालयांचा यात समावेश आहे. मतदारसंघातील या पंधरा गावांतील तलाठी कार्यालयांना नूतन इमारत प्राप्त होणार असून नागरिकांना महसुली कामकाजासाठी अधिक सुविधा प्राप्त होणार आहे.

इतर बातम्याः

केंद्रात मोदींचे सुशासन, राज्यात ठाकरेंचे कुशासन; भाजप नेते जावडेकरांचा हल्लाबोल

राज्यातल्या पहिल्या बैलगाडा शर्यतीप्रकरणी सत्ताधारी शिवसेनेच्या माजी आमदारावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल

नाशिकमध्ये प्रशासनाला डुलकी; जमावबंदीतला ‘ज’ सुद्धा पाहायला मिळेना, कोरोना नियमांच्या अमंलबजावणीचा विसर