एका रात्रीत गेम ओव्हर, पोलिसांची अशी कारवाई ज्यामुळे संपूर्ण गडचिरोली जिल्हा झाला नक्षलमुक्त
गडचिरोली पोलिसांच्या 'ऑपरेशन अंतिम प्रहार' मोहिमेत ८ जहाल माओवाद्यांना अटक करण्यात आली असून ६५ लाख रुपये आणि ५१ शस्त्रे जप्त केली आहेत. जिल्ह्यात आता एकही सक्रिय नक्षलवादी शिल्लक नसून गडचिरोली नक्षलमुक्त झाली आहे.

नक्षलवाद्यांचा गड समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांनी ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) संयुक्त ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ मोहिमेत तब्बल ८ जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर आता गडचिरोली जिल्ह्यात पोलीस दप्तरी नोंद असलेला एकही सशस्त्र नक्षलवादी सक्रिय उरलेला नाही, असा मोठा दावा पोलिसांनी केला आहे. यामुळे गडचिरोली जिल्हा आता पूर्णपणे नक्षलमुक्त झाला आहे.
या अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांच्या चौकशीतून पोलिसांनी घातपाताच्या उद्देशाने जंगलात लपवून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. तसेच ६५ लाख ३४ हजार रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली आहे. जप्त करण्यात आलेल्या एकूण ५१ शस्त्रांमध्ये २ एलएमजी (LMG) रायफल्स, ४ एके-४७ (AK-47), ४ एसएलआर (SLR) रायफल्स, ३ इन्सास (INSAS) रायफल्स आणि मोठ्या प्रमाणावर दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.
मोहीम कधी सुरु झाली होती?
फेब्रुवारी २०२६ मध्ये फोदेवाडा जंगल परिसरात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत पोलीस दलाचा एक सी-६० जवान शहीद झाला होता. या हत्येमध्ये सामील असलेल्या नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ सुरू करण्यात आले. या मोहिमेत सुरक्षा दलांनी तेलंगणातून चार, तर छत्तीसगड सीमाभागातील कुमनार आणि नैताळा येथून चार अशा एकूण आठ जणांना अटक केली.
६४ लाखांचे बक्षीस असलेले जहाल नक्षलवादी ताब्यात
अटक करण्यात आलेल्या आठही नक्षलवाद्यांवर शासनाने एकूण ६४ लाख रुपयांचे बक्षीस घोषित केले होते. यामध्ये नक्षल्यांच्या कंपनी क्रमांक १० चा प्रभारी डीव्हीसीएम राजू उर्फ मंगडू वेको, त्याची पत्नी जनी उर्फ नगी येमला, जयराम गावडे, मुकेश अवलाम, विजय तामो, रजिता मडावी, ज्योती पोटावी आणि आमती पोडियाम यांचा समावेश आहे. यातील जयराम गावडे हा गडचिरोलीतील एटापल्लीचा रहिवासी असून, उर्वरित सर्व नक्षलवादी छत्तीसगडमधील आहेत.
जिल्हा नक्षलमुक्त कसा झाला?
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्चनंतर गडचिरोलीत कंपनी क्रमांक १० चे केवळ ६ सदस्य सक्रिय होते. त्यापैकी महिला नक्षलवादी मोनी मडावी हिने छत्तीसगडमध्ये आत्मसमर्पण केले. तर उर्वरित पाच जणांना या मोहिमेत अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात एकही सशस्त्र नक्षलवादी शिल्लक राहिलेला नाही.
याच कारवाईदरम्यान नक्षल चळवळीला दुसरा मोठा धक्का बसला. ३८ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या ५ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. यामध्ये मधू उर्फ राकेश वेळदा (डीव्हीसीएम), जीवन मडकाम, रजनी धुर्वा, मंगली कुरसाम आणि लक्ष्मी पुणेम यांचा समावेश आहे. राकेश वेळदा हा गडचिरोलीचा असून इतर चार जण छत्तीसगडच्या विजापूरचे आहेत. एकीकडे ८ जणांना अटक आणि दुसरीकडे ५ जणांनी शस्त्रे टाकल्यामुळे गडचिरोलीतील नक्षलवादी चळवळ आता पूर्णपणे संपुष्टात आल्याचे मानले जात आहे.