गडचिरोलीत सर्पदंशाची दहशत! अवघ्या 2 दोन दिवसांत शाळा ओस, शेकडो विद्यार्थी परतले घरी

गडचिरोलीतील जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने भयभीत होऊन २२५ विद्यार्थ्यांनी शाळा सोडली, त्यामुळे शाळा ओस पडली आहे. याप्रकरणी तिघांवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे आश्रमशाळांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

गडचिरोलीत सर्पदंशाची दहशत! अवघ्या 2 दोन दिवसांत शाळा ओस, शेकडो विद्यार्थी परतले घरी
गडचिरोत सर्पदंशाची दहशत, शाळा पडली ओस
| Updated on: Aug 12, 2026 | 2:56 PM

गडचिरोलीतील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथे दोन दिवसांपूर्वी अतिशय दुर्दैवी घटना घडली. सर्पदंशामुळे तेथील आश्रमशाळेतील तीन विद्यार्थीनींचा दुर्दैवी मृत्यू झाला तर आणखी काही विद्यार्थी गंभीर जखमी झाले. विद्यार्थींनी रात्री झोपेत असताना ही घटना घडल्याची माहिती समोर आली होती. जपतलाई येथे ही अनुदानित निवासी आश्रम शाळा असून तेथील विद्यार्थिनी रात्री झोपल्या असतानाच सापाने दंश केला. त्यातील तिघींचा झोपेतच मृत्यू झाला. याप्रकरणामुळे प्रचंड खळबळ माजली असून सर्पदंशामुळे मोठी दहशत माजली आहे. या सर्पदशांचा अनेकांनी धसका घेतला असून ही घटना घडल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत या घटनेचे गंभीर परिणाम समोर आले आहेत. सर्पदंशाच्या भीतीने पालकांनी आपल्या मुलांना शाळेतून घरी परत नेल्याने आश्रमशाळा अक्षरशः ओस पडली आहे. शाळेतील 233 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 225 विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सध्या केवळ सात विद्यार्थी शाळेत राहिल्याचे सांगण्यात येत आहे. उर्वरित विद्यार्थ्यांबाबतचा तपशील प्रशासनाकडून स्पष्ट झालेला नाही.

सर्पदंशाच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये तसेच पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या पाल्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत अनेक पालकांनी तातडीने शाळेत येऊन मुलांना घरी नेलं. त्यामुळे नेहमी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने गजबजणाऱ्या या आश्रमशाळेत सध्या शांतता पसरली असून, शाळेच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आदिवासी विकासमंत्री आज शाळेला भेट देणार

दरम्यान, या गंभीर घटनेची दखल राज्य शासनाने घेतली असून, राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके आज दुपारी 3 वाजता जपतलाई आश्रमशाळेला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान ते घटनेची माहिती घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्याची शक्यता आहे. आश्रमशाळांमध्ये भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, यासाठी राज्य शासनाकडून कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जाणार, याकडे आता पालक, विद्यार्थी आणि नागरिकांचे लक्ष लागलं आहे.

मुख्याध्यापक, अधीक्षक व महिला अधीक्षिकेविरोधात गुन्हा

जपतलाई आश्रमशाळेतील सर्पदंशाच्या घटनेप्रकरणी धानोरा पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेतील निष्काळजीपणा आणि सुरक्षाव्यवस्थेकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोपावरून मुख्याध्यापक प्रशांत विलास ताटपल्लीवार, अधीक्षक भास्कर रामचंद्र भोयर आणि महिला अधीक्षिका भाग्यश्री ज्ञानेश्वर चिलमवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संविधान 2023 अनन्वय पाल न्याय ७५ कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला असून, घटनेपूर्वी व घटनेच्या वेळी शाळेतील परिस्थिती काय होती, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या आणि त्यामध्ये काही त्रुटी किंवा निष्काळजीपणा झाला का, याचा तपास केला जात आहे.

सर्पदंश आणि विद्यार्थिनींचा मृत्यू या दुर्दैवी घटनेनंतर समाजकल्याण आणि आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या चार सदस्यीय चौकशी समितीनेही शाळेत जाऊन पाहणी केली. सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्यात आला आहे.

दोन मुलींवर उपचार; एकीची प्रकृती गंभीर

सर्पदंशामुळे जखमी झालेल्या दोन विद्यार्थिनींवर गडचिरोली येथील सामान्य जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी एका विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असून, ती गेल्या तीन दिवसांपासून बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती आहे. त्यामुळे तिच्या प्रकृतीकडे वैद्यकीय यंत्रणेसह कुटुंबीयांचं लक्ष लागलं असून त्यांची चिंता अद्याप कमी झालेली नाही.

जपतलाईनंतर व्याहाड बुर्ज येथेही दोघांना सर्पदंश

जपतलाई आश्रमशाळेतील सर्पदंशाची घटना ताजी असतानाच गडचिरोलीजवळील व्याहाड बुर्ज येथेही विषारी सापाने दाम्पत्याला दंश केल्याची दुसरी घटना समोर आली आहे. गडचिरोलीपासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या व्याहाड बुर्ज परिसरातील हे शेतकरी दाम्पत्य घरातील फरशीवर जोपले होते, मात्र तेव्हाच त्यांना ‘मण्यार’ या विषारी सापाने दंश केला,अशी माहिती समोर आली. या दुर्दैवी घटनेत अमोल अनिल वसेकर आणि त्यांची पत्नी सुगंधा अमोल वसेकर हे दोघे जखमी झाले आहेत. सर्पदंशानंतर दोघांनाही तातडीने गडचिरोली येथील सामान्य जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांत गडचिरोली परिसरात सर्पदंशाच्या दोन गंभीर घटना समोर आल्याने नागरिकांमध्येही चिंता वाढली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us