शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीच्या चर्चा, अखेर गजाजन कीर्तिकरांनी मौन सोडलं; पक्ष सोडण्याबाबत काय म्हणाले?
शिंदेंच्या शिवसेनेचे नेते माजी खासदार गजानन कीर्तिकर यांनी पक्षावर नाराज असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर ते पक्ष सोडू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली होती. आता त्यांनी या सगळ्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

दुपारपासून वृत्तवाहिन्यांवर बातमी पाहिली. मला आश्चर्याचा धक्का बसला. मी पक्ष सोडणार, नाराज आहे, असे वृत्त होते. मी महाराष्ट्राला माझे मत सांगायला आलो आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समाधानाने काम करत आहे. गोव्यात मी प्रभारी म्हणून काम करत आहे. मी स्पष्ट सांगतो की ते वृत्त निराधार आहे. पक्ष सोडण्याची कुठलिही इच्छा नाही, असं गजानन कीर्तिकर म्हणाले आहेत.
काँग्रेस सोबत असलेले लागेबांधेमुळे मी जुना पक्ष सोडला. एकनाथ शिंदे यांनी जो उठाव केला त्याला मी साथ दिली. समाधानाने मी इथे काम करत आहे. कुठल्याही पक्षात जाण्याची माझी इच्छा नाही. एकनाथ शिंदे यांनी फोन केला. माझ्याबाबतीत चौकशी केली. मी असे काहीही नसल्याचे सांगितलं. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मी काम करत असून कुठेही जाण्याचा माझा इरादा नाही. शिंदे यांचे व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. लवकरच तो नंबर एकचा व्हावा यासाठी प्रयत्न करत आहे.
मला कुठलिही ऑफर नाही
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं, मला माहिती नव्हते. बातमी दिली तिला खोडसाळ म्हणणार नाही. पण पक्षाची बैठक झाली नाही, अशी प्रतिक्रिया मी दिली नाही. त्यांनी विचारले त्याचे उत्तर मी दिले. मी आक्षेप घेतलेला नाही. जो संपर्क लागतो, तो कार्यकर्त्यांसोबत ठेवावा लागतो. हे मी शिंदे यांना सांगितलं. मी माजी खासदार आहे. व्याधीग्रस्त लोक किंवा अन्यायग्रस्त लेक येतात, त्यासाठी संपर्क महत्वाचा आहे. त्यासाठी बैठका महत्त्वाच्या असतात.
काही गोष्टी तातडीने इलाज करावा लागतो. त्यासाठी आपण बैठक किंवा दुरध्वनी मागतो. ते खूप व्यस्त असतात. काहीवेळा लोकांची कामे आलेली असतात, तात्काळ इलाज हवा असतो. नेता म्हणून समजून घ्यायला पाहिजे. मी स्पष्ट सांगितले की मलाही धक्का बसला. मी स्पष्टीकरण देतो. संपर्काला अडचण येत असल्याचे मी सांगितलं., त्यावर शिंदे मी व्यवस्था करतो म्हणाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
उद्धव ठाकरेंकडून शिवसेना ही प्रो काँग्रेस होत होती. मराठी बाणा हरवत चालला होता. म्हणून आम्ही शिवसेना सोडली. मागील बैठक वेळी आम्ही सांगितलं, की एनडीए घटक म्हणून धावपळ करताना पक्षात तुम्ही वेळ द्या असे सुचविले आहे. महिन्यात एक बैठक घेण्याची मागणी केली आहे.