लाडक्या गणरायाच्या निरोपाने भक्त भावुक, जड अंत:करणाने बाप्पााचं विसर्जन

राज्यभरात आज आपल्या लाडक्या गणरायाला ढोल ताशाच्या गजरात निरोप देण्यासाठी गणेश भक्त सज्ज झाले असून, ठीक ठिकाणी विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी गणेशाचं विसर्जन देखील करण्यात आलं आहे.

लाडक्या गणरायाच्या निरोपाने भक्त भावुक, जड अंत:करणाने बाप्पााचं विसर्जन
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 06, 2025 | 9:40 PM

राज्यभरात आज आपल्या लाडक्या गणरायाला ढोल ताशाच्या गजरात निरोप देण्यासाठी गणेश भक्त सज्ज झाले असून, ठीक ठिकाणी विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी गणेशाचं विसर्जन देखील करण्यात आलं आहे. मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश भक्तांचा महापूर लोटला आहे. मोठ्या सार्वजनिक मंडळाचे गणपती विसर्जनासाठी चौपाटीवर दाखल झाले आहेत. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देताना गणेश भक्त चांगलेच भावुक झाल्याचं पहायला मिळत आहे, अशाच प्रकारचा भक्तांचा महासागर रात्रभर या ठिकाणी पहायला मिळणार आहे.

पुण्यातील मानाच्या पाचही गणपतीचं विसर्जन  

पुण्यामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली आहे, संपूर्ण पुणे शहर गुलालामध्ये न्हाऊन निघालं आहे. पुण्यातील मानाच्या पाचही गणपतीचं विसर्जन झालं आहे. पुण्यातील मानाच्या पाच गणपती पैकी एक असलेला  केसरीवाडा गणपतीच्या विसर्जनावेळी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. विसर्जनापूर्वी, भक्तांनी बाप्पाची मनोभावे पूजा केली. त्यानंतर या गणपतीचं विसर्जन करण्यात आलं आहे.

टिळक चौकात पुणेकरांची गर्दी  

पुण्यामध्ये गणेशोत्सव हा मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. पुण्यातील गणेशोत्सव पहाण्यासाठी राज्यभरातून भाविक येतात. आज गणेश विसर्जन मिरवणूक पहाण्यासाठी पुण्यातील टिळक चौकात पुणेकरांनी मोठी गर्दी केली आहे, लाडक्या बाप्पाची यावेळी थाटात  मिरवणूक काढण्यात आली.

जुहू बीचवर मुंबईकरांची गर्दी  

मुंबईतील जुहू बीचवर गणपती बाप्पाचे विसर्जन शांततेत सुरू आहे. मोठे गणपती समुद्रात विसर्जित केले जात आहेत तर लहान गणपती कृत्रिम तलावात विसर्जित केले जात आहेत. विसर्जनस्थळी  कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, संपूर्ण जुहू समुद्रकिनाऱ्यावर सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवले जात आहे. भक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी मोठ्या संख्येने बीएमसी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, तसेच कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी  जीवरक्षकांचं पथक देखील तैनात करण्यात आलं आहे. राज्यभरात आज भक्तांकडून आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येत आहे.

दरम्यान दुसरीकडे  आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मिरज नगरी गणरायाच्या जय घोषाने दुमदुमून गेली आहे. अनंत चतुर्थीच्या दिवशी भव्य दिव्य मिरवणुकीने गणेश विसर्जन करण्याची मिरजेची परंपरा आहे, पारंपारिक वाद्य आणि डिजेच्या तलावर आज सकाळपासूनच मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.

जालना शहरात देखील उत्साह पाहायला मिळत आहे. जालना शहरातल्या मानाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. यावेळी  शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांच्या पत्नी सीमा खोतकर यांच्या हस्ते गणपतीची आरती संपन्न झाली, त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.