Ganpati Visarjan 2026 LIVE: गणपती निघाले गावाला चैन पडेना आम्हाला… मुंबईसह राज्यात विसर्जन मिरवणुकीची लगबग, रस्त्यावर भाविकांची मोठी गर्दी

Ganpati Visarjan 2026 LIVE Coverage Mumbai, Pune and Maharashtra: साश्रूनयनांनी आज लाडक्या बाप्पााला निरोप देण्यात येणार आहे. अनेक मंडळांची विसर्जनाची तयारी सुरू झाली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर येथील मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणूक आज निघतील.

Ganpati Visarjan 2026 LIVE: गणपती निघाले गावाला चैन पडेना आम्हाला... मुंबईसह राज्यात विसर्जन मिरवणुकीची लगबग, रस्त्यावर भाविकांची मोठी गर्दी
| Edited By: | Updated on: Sep 25, 2026 | 9:34 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 25 Sep 2026 09:35 AM (IST)

    मुंबईतील परळचा राजा तेजुकायाची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात सुरू झाली

    मुंबईतील परळचा राजा तेजुकायाची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे. दख्खनचा राजा श्री ज्योतिबा या संकल्पनेवर आधारित यंदाचा देखावा भाविकांचे मुख्य आकर्षण ठरला आहे. गुलालाची उधळण, ढोल-ताशांचा गजर आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात हजारो भाविक बाप्पाला निरोप देण्यासाठी एकत्र जमले आहेत.

  • 25 Sep 2026 09:30 AM (IST)

    वाडीवऱ्हे हद्दीतील वालदेवी धरणावर गणपती विसर्जनास बंदी

    वाडीवऱ्हे हद्दीतील वालदेवी धरणावर गणपती विसर्जनास बंदी. पिंपळद येथील गावकऱ्यांनी केला एकमताने ठराव मंजूर. नाशिक व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी विसर्जनासाठी न येण्याचे गावकऱ्यांचे आवाहन. सुरक्षिततेच्या कारणास्तव गावकऱ्यांचा एकमताने ठराव. जीवितहानी व धरणातील प्रदूषण टाळण्यासाठी घेतला निर्णय


  • 25 Sep 2026 09:26 AM (IST)

    मानाचा चौथा तुळशीबाग गणेशाची मूर्ती मुख्य रथात विराजमान

    मानाचा चौथा तुळशीबाग गणेशाची मूर्ती मुख्य रथात विराजमान होत आहे, आता बाप्पाची मिरवणूकी निघेल, ज्यासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत.

  • 25 Sep 2026 09:20 AM (IST)

    पुण्यातील मानाच्या गणपतीची मिरवणूक

    पुण्याचा मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती पालखीत विराजमान…मानाच्या तिसरा गुरुजी तालीम आणि चौथा तुळशीबाग गणपती एकापाठोपाठ मुख्य रस्त्यावर मिरवणूकीसाठी सज्ज…..

  • 25 Sep 2026 09:15 AM (IST)

    पुणे – भीमाशंकर परिसरात पावसाचा कहर

    पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भीमाशंकर परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून रिमझिम पावसानंतर आज मुसळधार सरी कोसळल्याने भीमाशंकर मंदिराच्या पायऱ्यांवरून मोठ्या प्रमाणात पाणी मंदिर परिसरात आले आहे. त्यामुळे मंदिराच्या सभोवती पाणी साचले आहे. सध्या भिमाशंकर मंदिर परिसरात विविध विकास कामे सुरू असून सध्या पावसामुळे ही कामे बंद ठेवण्यात आली आहे …


  • 25 Sep 2026 09:10 AM (IST)

    मुंबईतील बोरिवली पूर्व येथील उपनगरचा राजा आता विसर्जनासाठी मार्गस्थ

    मुंबईतील बोरिवली पूर्व येथील उपनगरचा राजा आता विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे.गणरायाला मंडपातून बाहेर काढताच भक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे. मोठ्या संख्येने गणेशभक्त बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. बोरिवली पूर्व येथून उपनगरच्या राजाची विसर्जन मिरवणूक गोराईच्या दिशेने मार्गस्थ झाली असून, गोराई येथे बाप्पाचे विसर्जन करण्यात येणार आहे. बाप्पाला निरोप देताना भक्तांमध्ये उत्साहासोबतच भावनिक वातावरणही पाहायला मिळत आहे. ‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात उपनगरचा राजा आता विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे.

  • 25 Sep 2026 09:00 AM (IST)

    इंदापूर – निमगाव केतकीत गणेशाची उत्साहात विसर्जन मिरवणूक

    पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे काल रात्री सार्वजनिक गणेश मंडळांनी आपल्या लाडक्या बाप्पाला मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात निरोप दिला. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीचे खास वैशिष्ट्य म्हणजे विविध मंडळांनी डीजे ला फाटा देत पारंपारिक वाद्यांना प्राधान्य दिलं. बँड पथक, ढोल-ताशा आणि झांज पथकांच्या गजरात तरुणाईने ठेका धरला. सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये आणि आकर्षक विद्युत रोषणाईने मिरवणुकीला विशेष शोभा आली होती, आकर्षक फुलांची सजावट, गुलालाची उधळण आणि विद्युत रोषणाई यामुळे मिरवणूक लक्षवेधी ठरली. सर्व मंडळांनी शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणुका पार पडल्या..

  • 25 Sep 2026 08:55 AM (IST)

    रायगड जिल्ह्यात आज दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता

    रायगड जिल्ह्यात आज दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता होत आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी जिल्ह्यात तब्बल १३ हजार ५९७ बाप्पांचे विसर्जन होणार आहे. यामध्ये १३ हजार ४३९ घरगुती आणि १५८ सार्वजनिक गणेशमूर्तींचा समावेश आहे. नदी, तलाव आणि समुद्र अशा ५०० हून अधिक विसर्जनस्थळी बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे.

  • 25 Sep 2026 08:50 AM (IST)

    ऐतिहासिक रंगारी बदक चाळीच्या महाराजांना निरोप देण्याची तयारी अंतिम टप्प्यात

    ऐतिहासिक रंगारी बदक चाळीच्या महाराजांना विसर्जन मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. १९३७ मध्ये छोट्याशा खोलीत सुरू झालेली गणेशोत्सवाची परंपरा आहे. १९४० मध्ये सार्वजनिक मंडळाचे रूप मिळाले. लोकमान्य टिळकांच्या विचारांनी प्रेरित या मंडळाने वर्षानुवर्षे समाजप्रबोधनाचे देखावे साकारत वारसा जपला. चलचित्रांच्या माध्यमातून सामाजिक आणि ऐतिहासिक विषय मांडण्याची रंगारी बदक चाळीची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

  • 25 Sep 2026 08:45 AM (IST)

    पुण्यातील वैभवशाली परंपरा असलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार

    पुण्यातील वैभवशाली परंपरा असलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरती आकर्षक रांगोळी काढण्यात आली आहे. महात्मा फुले मंडई ते लक्ष्मी रोड विसर्जन मार्गावरती ठिकठिकाणी लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी रांगोळीची सजावट करण्यात आली आहे. रांगोळीच्या माध्यमातून खाद्यपदार्थात होणारी भेसळ या संदर्भात जनजागृती करण्यात आली आहे.

  • 25 Sep 2026 08:40 AM (IST)

    गणपत्ती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या चा जयघोष

    जड अंतःकरणाने लाडक्या गणरायाला भाविक भक्त आज निरोप देणार आहे. गेल्या दहा दिवसांपासून राज्यात भक्तीमय आणि चैतन्यमय वातावरण होते. घरोघरी गणपती बसवण्यात आले. तर सार्वजनिक गणेश मंडळांनी चित्तवेधक देखावे सादर केले. आज बाप्पााला निरोप देण्याची वेळ आली आहे. आज गल्लोगल्ली गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष सुरू झाला आहे.

  • 25 Sep 2026 08:35 AM (IST)

    पुण्यातील तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मुख्य विसर्जन मिरवणूक 9 वाजता

    मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मुख्य विसर्जन मिरवणूक 9 वाजता सुरू होणार आहे. तांबडी जोगेश्वरी मानाचा दुसरा गणपती आहे. गणेशाचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच गर्दी झाली आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेशभक्त भावुक झाले आहेत.

  • 25 Sep 2026 08:30 AM (IST)

    मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीच्या मुख्य विसर्जन मिरवणूकीला 10 वाजता होणार सुरूवात

    मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीच्या मुख्य विसर्जन मिरवणूकीला 10 वाजता सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांच्या बैलजोडी आणि रथा वरील शेतमाल पाहण्यासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी केली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीशी निगडित असलेली बैलजोडी आणि शेतकऱ्यांच्या शेतातून निघालेला शेतीमाल यांचा मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणपतीचा मुख्य रथाचा देखावा लक्ष वेधून घेत आहबे.

  • 25 Sep 2026 08:20 AM (IST)

    परळचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ

    नरेपार्क येथील परळचा राजा विसर्नजनासाठी मार्गस्थ झाला. गणरायाच्या मनमोहक रुपाने भाविक हरकून गेले. वारकऱ्यांच्या रुपातील बाप्पाचं हे मनाला भावणारं रुप डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. परळचा राजा मंडपातून लालबागच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे.

  • 25 Sep 2026 08:15 AM (IST)

    इगतपुरी पोलिस ठाण्यात गणरायाचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन

    इगतपुरी पोलिस ठाण्यात गणरायाचे पर्यावरण पूरक पद्धतीने विसर्जन करण्यात आले. पोलिस ठाण्याच्या आवारातील कृत्रिम हौदात गणरायाचे विसर्जन करण्यात आले. ध्वनिक्षेपक न लावता साधेपणाने विसर्जन सोहळा पार पडलापोलिस बांधवांनी मनोभावे गणरायाची आरती केली. आरतीनंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत गणरायाला निरोप देण्यात आला.

  • 25 Sep 2026 08:10 AM (IST)

    लालबागचा राजाच्या विसर्जन सोहळ्याची लगबग

    11 दिवसाच्या मनोभावे सेवेनंतर लालबागचा राजाच्या विसर्जन सोहळ्याची लगबग सुरू झाली आहे. सर्व गणेश भक्त मंडपा मध्ये पांढरे वस्त्र परिधान करून, लालबागच्या राजाच्या विसर्जनाची तयारी करत आहेत. सकाळी ९ वाजल्या पासून विसर्जन मिरवणुकीची सुरवात होणार आहे. सकाळी १० वाजता लालबागचा राजाची विधिवत पूजा होणार. उत्तर पूजा नंतर लालबागचा राजाची राजेशाही विसर्जन मिरवणूकीला दुपारी १२ वाजता सुरवात होणार आहे.

  • 25 Sep 2026 08:05 AM (IST)

    मुंबईचा राजा मार्गस्थ 

    मुंबई चा राजा मार्गस्थ झाला आहे. त्या साठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबई च्या राजाचा आगामी वर्ष हे शतक महोत्सवी वर्ष असणार आहे. त्या साठी वेध शतकाची भव्य रांगोळी काढण्यात आली आहे.. तर राजाच्या पुष्पवृष्ठी ची देखील तयारी करण्यात आली आहे..

  • 25 Sep 2026 07:58 AM (IST)

    गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी जय्यत तयारी

    गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोठ्या गणपतींसाठी स्वतंत्र मार्ग करण्यात आला आहे. समुद्रात कृत्रिम ब्रिजसह पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिका आणि पोलिसांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने होणाऱ्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर चौपाटी परिसरात गणेशमूर्तींसाठी स्वतंत्र रांगा दोन तयार करण्यात आल्या आहेत. चार फुटांखालील गणपतींसाठी डाव्या बाजूला, तर मोठ्या सार्वजनिक मंडळांच्या गणपतींसाठी उजव्या बाजूला स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. पीओपीच्या गणेशमूर्ती समुद्रात विसर्जित होऊ नयेत यासाठी कृत्रिम तलावांचीही उभारणी करण्यात आली आहे.

गणपती बाप्पा आज त्यांच्या गावाला निघाले, अर्थात आज राज्यात गणेश विसर्जन होत आहे. अनंत चतुर्दशीला साश्रूनयनांनी लाडक्या बाप्पााला निरोप देण्यात येत आहे. मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिका आणि पोलिसांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने होणाऱ्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर चौपाटी परिसरात गणेशमूर्तींसाठी स्वतंत्र रांगा दोन तयार करण्यात आल्या आहेत. मुंबईचा राजा विसर्जन मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरुवात होईल. नवसाला पावणारा राजा अशी ख्याती असलेला लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे. उद्या सकाळी 10 वाजता लालबागच्या राजाची राजेशाही विसर्जन मिरवणूक तराफ्यावरून अरबी समुद्रात सुरू होणार आहे. अत्याधुनिक हायड्रॅलिक तराफ्यावरून खोल समुद्रात राजाचं विसर्जन करण्यात येणार आहे.

विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी महापालिकांनी गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे. पुण्यातील मानाच्या पाच गणपतींच्या विसर्जनाची तयारी सुरू झाली आहे. पुण्यातील मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीच्या मुख्य विसर्जन मिरवणूक 9 वाजता वाजता सुरुवात होणार आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रस्त्यावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यंदा विसर्जन मिरवणुकीवर ड्रोन आणि एआय प्रणालीची गस्त असेल. यामुळे अनुचित प्रकारांना आळा घालणे सोपे होईल.

तर दुष्काळग्रस्त भागात नदी आणि नाले हे पाण्याचे स्त्रोत आटल्याने गणेश विसर्जन कुठे करावे असा सवाल भाविकांसमोर आहे. काही ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी विहिरीत विसर्जन करण्यात येणार आहे. काही तलावातही विसर्जन करण्यात येणार आहे. महापालिका, नगरपालिका आणि प्रशासनाने गणेश विसर्जनासाठी जय्यत तयारी केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us