
मुंबई : वेळ आली होती पण काळ आला नव्हता… या म्हणीचा प्रत्यक्षात अनुभव मुंबई पोलीस दलातील एका पोलीस शिपायाच्या(Mumbai police constable) कुटुंबीयांनी घेतला आहे. एका भीषण अपघातातून हे कुटुंब थोडक्यात बचावले आहे. घरात गॅसची गळती होऊन मोठी दुर्घटना घडणार होती. मात्र घरभर दुर्गंधी पसरल्याने भीतीने हे कुटुंब घराच्या बाहेर आले आणि इतक्यात सिलेंडरचा स्फोट(Gas cylinder explosion) झाला. या थरारक अपघातातून हे कुटुंब सुखरूप बचवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नशीब बलवत्तर म्हणून आम्ही या अपघातातून वाचलो आहोत. थोडा जरी उशीर झाला असता तर आमचं काय झाल असत याची कल्पनाही करु शकत नाही अशी प्रतिक्रिया या कुटुंबियावने दिली आहे.
मुंबईतील भायखळा पोलीस स्टेशनमध्ये शिपाई पदावर काम करणारे विजय गोडेकर यांच्या कुटुंबियांनी हा थरारक अनुभव घेतला आहे. गोडेकर यांच्या घरावर मोठं संकट आलं होतं. परंतु दैव बलवत्तर म्हणून ते आणि त्यांचं कुटुंब या संकटातून बचावले. घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात त्यांचं कुटुंब थोडक्यात बचावलं. परंतु त्यांच घर आणि सगळा संसार या स्फोटात उद्ध्वस्त झाला आहे.
पोलीस दलाचं मनोधैर्य कायम राहावं म्हणून ही घटनेची माहिती मिळताच मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे विजय गोडेकर यांच्या घरी दाखल झाले. फणसाळकर यांनी गोडेकर आणि त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केले. यावेळी संसार पुन्हा उभा करण्यासाठी पोलीस दलाकडून मदत केली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिले.
विजय गोडेकर यांनी सर्व घटनाक्रमक कथन केला आहे. 22 जुलै रोजी दुपारी 12 च्या सुमारास गोडेकर यांनी गॅस सिलेंडर बदलला होता. पण तो कसा लीक झाल्याचे त्यांना समजलं नाही. यानंतर ते तयारी करुन पोलीस स्टेशनला ड्यूटीवर गेले. यानंतर त्यांची आई, पत्नी आणि माझा मुलगा दोन वाजेपर्यंत घरातच होते. त्यानंतर ते महालक्ष्मी मंदिरात गेले. संध्याकाळी सहाच्या सुमारास ते घरी परत आले.
घराचा दरवाजा उघडताच त्यांना गॅसचा दुर्गंध आला. गॅसगळती होऊन वायू संपूर्ण घरभर पसरला होता. खूपच वास येत असल्याने त्यांना गॅस गळती झाल्याचा संशय आला. म्हणून तिघेही तात्काळ घराबाहेर आले. ते घराबाहेर आले आणि काही क्षणातच मोठा आवाज आला गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की त्यांच्या घरातील सर्व वस्तुंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.