
पुण्यात 30 सप्टेंबरच्या रात्री वडगाव बुद्रुक परिसरात झालेला एका कार आणि रिक्षाचा अपघात चांगलाच गाजतोय, त्याचं कारण म्हणजे ज्या कारची रिक्षाला धडक बसून हा अपघात झाला ती कार आहे प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिची. या अपघातात रिक्षाचालक जबर जखमी झाला मात्र कारचालक त्याच्या मदतीला गेला नाही उलट तिथून पळून गेला. नंतर ती कारही तिथून हलवण्यात आली. जखमी रिक्षाचालक सामाजी मरगळे यांना उपचारांसाठी स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केलं. यानंतर नृत्यांगना गौतमी पाटलीविरोधात रोषाचे वातावरण निर्माण झाले, तिच्यावर टीका झाली, अटकेची मागणी झाली. जखमीच्या उपचारासाठी तिने पुढाकार घ्यायला पाहिजे, पण ती पुढे आलीच नाही असं म्हणत अनेकांनी तिच्यावर टीका केली. जखमी रिक्षाचालकाच्या मुलीनेही गौतमीवर बरीच टीका केली.
आता या सर्व मुद्यांवर गौतमीने माध्यमांसमोर प्रतिक्रिया देत तिची बाजू मांडली आहे. जखमी रिक्षाचलकाच्या कुटुंबाला आपण भेटणार नाही, असंही तिने सांगितलं, मात्र त्यामागचं कारण स्पष्ट करताना तिच्या डोळ्यात अश्रू तरळले.
नाही त्या गोष्टींवरून माझ्यावर आरोप का ?
ज्या दिवशी तो अपघात झाला तेव्हा मी कारमध्ये नव्हती. पोलिसांनी हे स्पष्ट केलंय, सीसीटीव्हीमध्येही ते अगदी स्पष्ट दिसलं आहे तरीही लोक मला ट्रोल करत आहेत असं गौतमी म्हणाली. या विषयावरून राजकारण केलं जात असल्याचा आरोप केला. नाही त्या गोष्टींवरून माझ्या वर का आरोप केले जात आहेत ? यामागचं कारण काय ते मला माहीत नाही. पण ज्या गोष्टींमध्ये मी नाहीये, त्यात मला पाडू नका असं तिने स्पष्ट शब्दांत सुनावलं.
म्हणून जखमीच्या कुटुंबियांची भेट घेतली नाही
ज्या वेळी अपघात झाला, तेव्हा मी गाडीत उपस्थित नव्हते. मात्र अपघातनंतर जखमी, पीडित कुटुंब होतं, त्यांची भेट घेण्यासाठी माझे भाऊ गेले होते. त्यांनी त्यांच्यासमोर (पीडित कुटुंबासमोर) मदतीचा हात पुढे केला होता, पण गुन्हा दाखल असल्यामुळे त्यांनी आम्ही देऊ केलेली मदत नाकारली. म्हणून मी तिथून परत आले असं गौतमीने सांगितले. जे सुरू आहे कायदेशीररित्या, ते होऊ दे असंही ती म्हणाली.
Gautami Patil : मला अजून ट्रोल करा.. गौतमी पाटीलने सोडलं मौन ! अपघाताबद्दल म्हणाली…
अपघातानंतर आम्हाला गौतमी पाटीलने मदत करायला हवी होती, पण कोणीच आलं नाही असा आरोप पीडिताच्या कुटुंबियांनी केला आहे. त्यावर गौतमीला प्रश्न विचारण्यात आला असता तिने सडेतोड उत्तर दिलं. ‘ माझ्यावर आरोप करायला सगळे बसले आहेत. मी प्रत्येक वेळेस ट्रोल होत असते. सुरूवातीपासून ते आत्तापर्यंत मी ट्रोलच होत आले आहे. जो तो येतो, बोलून जातो. आता यापुढे जे होईल ते सगळं न्यायाने, व्यवस्थित होईल’ असं गौतमी सुनावलं.
( या प्रकरणात ) माझं पोलिसांना पूर्णपणे सहकार्य आहे, जे कोणी दोषी असतील त्यांन नक्की शिक्षा मिळावी, माझा पूर्णपणे सपोर्ट आहे या गोष्टीला असं गौतमीने सांगितलं. अपघातानंतर मी माझ्या भावांना तिथे पाठवलं, पण तिथे जसे रिप्लाय आले, त्या वरून मला वाटलं की, मी असा विचार केला की मी तिथे जाऊनदेखील काहीही उपयोग नाही, म्हणून मी तिथे ( जखमी पीडित कुटुंबियांच्या घरी) गेले नाही असंही गौतमी म्हणाली. मी त्यांच्यासमोर मदतीचा हात पुढे केला होता, याचा पुनरुच्चारही गौतमीने केला. याप्रकरणात पुढे काय होतं, पोलिस काय कारवाई करतील हे पाहणं महत्वाचं ठरेल