हातात झाडू घेतला, अन् थेट कामाला लागले, मंत्री गिरीश महाजन साफसफाईसाठी उतरले; नेमकं काय घडलं?
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तहसील कार्यालयातील अस्वच्छता पाहून मंत्री गिरीश महाजन संतापले. स्वतः हातात झाडू घेत केली साफसफाई. कार्यालयात दारूच्या बाटल्या बघताच व्यक्त केली नाराजी.

सरकारी कार्यालयांमध्ये स्वच्छता आणि शिस्त राखण्याच्या सूचना वारंवार दिल्या जातात. मात्र, प्रत्यक्षात काही कार्यालयांमध्ये अस्वच्छतेचे चित्र पाहायला मिळते. असाच प्रकार जळगाव जिल्ह्यातील जामनेर तहसील कार्यालयात समोर आला.
तहसील कार्यालयातील अस्वच्छता आणि दुरवस्था पाहून मंत्री गिरीश महाजन यांचा पारा चांगलाच चढला. विशेष म्हणजे, त्यांनी केवळ कर्मचाऱ्यांना सूचना देण्याऐवजी स्वतः हातात झाडू घेत कार्यालयाची साफसफाई केली.
मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर येथील तहसील कार्यालयाला भेट दिली. यावेळी कार्यालयाच्या कानाकोपऱ्यात धूळ, घाण आणि जाळ्यांचे साम्राज्य असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सरकारी कार्यालयाची अशी दुरवस्था पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
कार्यालयातील स्वच्छतेची जबाबदारी असतानाही कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचे पाहून त्यांनी कर्मचाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले. तहसील कार्यालयातील स्वच्छतागृहाची पाहणी करताना तेथे दारूच्या बाटल्या आढळल्याची खंतही महाजन यांनी व्यक्त केली.
सरकारी कार्यालयाच्या स्वच्छतागृहात अशा प्रकारचे चित्र दिसणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे, स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी लावण्यात आलेले फलकही अस्वच्छ अवस्थेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.