Shashikant Patil: लोकशाहीने आमचा विजय, ठोकशाहीने त्यांचा… गोकुळच्या निकालानंतर शशिकांत पाटील संतापले, मोठं वक्तव्य करत म्हणाले…

Shashikant Patil Statement: गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का मिळाला आहे. या निवडणुकीत महायुतीचे राजेश पाटील विजयी झाले आहेत. तर शशिकांत पाटलांचा पराभव झाला आहे.

Shashikant Patil: लोकशाहीने आमचा विजय, ठोकशाहीने त्यांचा... गोकुळच्या निकालानंतर शशिकांत पाटील संतापले, मोठं वक्तव्य करत म्हणाले...
Shashikant Patil Questions Gokul Election
| Updated on: Nov 10, 2026 | 3:46 PM

कोल्हापूरच्या राजकारणात महत्त्वाची मानली जाणारी गोकुळ दूध संघाची निवडणूक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या निवडणुकीत महायुतीने बाजी मारत समविचारी आघाडीला धक्का दिला आहे. महायुतीचे उमेदवार आणि माजी आमदार राजेश पाटील यांनी समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत पाटील यांचा पराभव केला आहे. या निकालामुळे सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या हातातून सत्ता निसटल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या मोठ्या घडामोडीनंतर शशिकांत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. संताप व्यक्त करत त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजेश पाटील यांना एकूण १६ मते मिळाली, तर शशिकांत पाटील यांना १३ मतांवर समाधान मानावे लागले. अवघ्या तीन मतांच्या फरकाने झालेल्या या निकालाने गोकुळमधील सत्तासंघर्षाला नवे वळण मिळाले आहे. विशेष म्हणजे, शासनाकडून नियुक्त करण्यात आलेल्या संचालकांची मते राजेश पाटील यांच्या पारड्यात पडल्याने महायुतीच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे सांगितले जात आहे.

Loading...

या निकालामुळे सतेज पाटील यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. गोकुळच्या सत्तेवर वर्चस्व मिळवण्यासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार प्रयत्न केले होते. मात्र, मतदानाच्या अंतिम टप्प्यात महायुतीने बाजी मारली आणि समविचारी आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. पराभवानंतर समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या निकालावर प्रतिक्रिया देताना त्यांनी महायुतीवर निशाणा साधला.

यावेळी बोलताना समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत पाटील म्हणाले की, लोकशाहीने आमचा विजय झाला आहे, तर ठोकशाहीने त्यांचा विजय झाला आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. तसेच आम्हाला न्यायदेवतेवर विश्वास आहे. न्यायदेवता आम्हाला नक्की न्याय देईल, असेही शशिकांत पाटील म्हणाले. शासनाने आमच्यावर संचालक लादले आहेत, असा आरोप करत त्यांनी नियुक्त संचालकांच्या मतदानावरही आक्षेप घेतला.

शासननियुक्त संचालकांच्या मतांमुळे निवडणुकीच्या निकालावर परिणाम झाल्याचा सूर शशिकांत पाटील यांच्या प्रतिक्रियेतून उमटला. त्यामुळे या निवडणुकीतील विजय-पराभवापेक्षा मतदान प्रक्रियेवरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. एकीकडे १६ मते मिळवत राजेश पाटील यांनी महायुतीला विजय मिळवून दिला, तर दुसरीकडे १३ मते मिळालेल्या शशिकांत पाटील यांनी निकालाविरोधात न्यायालयीन लढाईचे संकेत दिले आहेत. त्यामुळे गोकुळमधील सत्तासंघर्ष निकालानंतरही संपण्याची चिन्हे नाहीत. आता या प्रकरणात पुढे काय घडते आणि शशिकांत पाटील न्यायालयात दाद मागतात का, याकडे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us