2 कोटी 72 लाखांच्या धान्याचा अपहार, व्यवस्थापकीय संचालक निलंबित, आता कुणाचा नंबर?

| Updated on: Oct 06, 2022 | 6:06 PM

दोन्ही केंद्रावर एकूण 2 कोटी 72 लाख 64 हजार 81 रुपयांचा धान घोटाळा उघड करण्यात आला आहे.

2 कोटी 72 लाखांच्या धान्याचा अपहार, व्यवस्थापकीय संचालक निलंबित, आता कुणाचा नंबर?
देवरीतील व्यवस्थापकीय संचालकावर मोठी कारवाई
Image Credit source: t v 9
Follow us on

शाहिद पठाण, TV9 मराठी, प्रतिनिधी, गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात धान घोटाळ्याचा पहिला बळी गेला. गोंदिया जिल्ह्याच्या आलेवाडा व गोरे धान खरेदीत व भरडाईमध्ये अनियमितता झाली होती. या प्रकरणी गोंदिया जिल्ह्याच्या देवरी उपप्रादेशिक व्यवस्थापक आशीष मुळेवार याला निलंबित करण्यात आलंय. मुळेवार हा महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचा व्यवस्थापकीय संचालक होता. विशेष म्हणजे आशीष मुळेवार याच्यावर 2 कोटी 72 लाख 64 हजार 81 रुपयांच्या धान्याचा अपहार केल्याचं सिद्ध झालंय.

आशीष मुळेवार याच्यावर धान्यसाठा शिल्लक नसणाऱ्या संस्थेवर कारवाई न केल्याचा ठपका ठेवण्यात आला. शिवाय धान्याचा अपहार करणे तसेच चौकशी अधिकाऱ्यांवर दबाब टाकणे आणि शासनाचे नुकसान करणे आदी दोष सिद्ध करण्यात आले आहेत.

गोंदिया जिल्ह्यात पणन महामंडळ व आदिवासी भागात आदिवासी विकास महामंडळाद्वारे धान खरेदी केली जाते. यासाठी हे विभाग धान खरेदी केंद्राला मान्यता देते. त्यांच्याकडून शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यात येते. गोंदिया जिल्ह्यात सुद्धा दोन्ही महामंडळ यांनी धान खरेदीत अनियमितता केल्याने त्यांची चौकशी सुरू आहे.

यात आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय देवरीकडून हंगाम 2020-21 मध्ये खरेदी केंद्र आलेवाडा व हंगाम 2021-22 मध्ये खरेदी केंद्र गोरे यांना धान खरेदीचा अधिकार देण्यात आला होता.

मात्र दोन्ही केंद्रांनी केवळ कागदावर खरेदी दाखवत शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावला. हंगाम 2020-21 मध्ये खरेदी केंद्र आलेवाडा येथे 90 लाख 55 हजार 784 रुपयांचा 4 हजार 847.85 क्विटल धानाचा साठा याचा घोटाळा उघडकीस आला. हंगाम 2021-22 मध्ये खरेदी केंद्र गोरे येथे 1 कोटी 82 लाख 8 हजार 297 रुपयांच्या 9 हजार 385.72 धानाचा साठा घोटाळा उघडकीस आला.

दोन्ही केंद्रावर एकूण 2 कोटी 72 लाख 64 हजार 81 रुपयांचा धान घोटाळा करण्यात आला आहे. प्रादेशिक व्यवस्थापन भंडारा यांनी दोन्ही केंद्रावरील धानाच्या भरडाईसाठी राइस मिलर यांना डीओ दिले.

या दोन्ही केंद्रांवर धान आढळून आलेच नाही. याची तक्रार झाल्यावर व्यवस्थापकीय संचालक यांच्याद्वारे चौकशी करण्यात आली. भ्रष्ट अधिकारी आशीष मुळेवार यांनी धान साठा शिल्लक नसणाऱ्या संस्थेवर कारवाई केली नाही.

धान्याचा अपहार करणे तसेच चौकशी अधिकाऱ्यांवर दबाब टाकणे असे आरोप त्याच्यावर सिद्ध झालेत. शासनाचे नुकसान करणे आदी दोष सिद्ध करण्यात आले. त्यामुळं आशीष मुळेवार याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे आशीष मुळेवार याच्या या कामात मदत करणाऱ्या त्यांच्यासह तत्कालीन विपणन निरीक्षक एम एस इंगले, प्रतवारिकार व विपणन निरीक्षक सी. डी. जुगनाके या तिघांवर फौजदारी गुन्हे नोंद करण्यात येणार आहे.

गोंदिया जिल्ह्यात घोटाळ्यात एका वर्ग 1 च्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली. त्यामुळं इतर भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील धान घोटाळ्यात अजून किती अधिकारी अडकतात हे पाहणे विशेष महत्वाचे ठरणार आहे.