रोपांची काळजी घेतली, लहानाचे मोठे केले; आगीत शंभरावर वृक्षांची क्षणात राखरांगोळी

| Updated on: Mar 03, 2023 | 10:08 AM

चंदनासह फळबागाच्या झाडांना अज्ञात इसमांनी आग लावली. या घटनेत जवळपास 130 झाडे व सिंचनासाठी लावण्यात आलेले पाईप पूर्णतः जळून खाक झाले.

रोपांची काळजी घेतली, लहानाचे मोठे केले; आगीत शंभरावर वृक्षांची क्षणात राखरांगोळी
Follow us on

गोंदिया : गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड नजिकच्या मुंडीपार शिवारातील शेतात फळबाग लागवड केली होती. चंदनासह फळबागाच्या झाडांना अज्ञात इसमांनी आग लावली. या घटनेत जवळपास 130 झाडे व सिंचनासाठी लावण्यात आलेले पाईप पूर्णतः जळून खाक झाले. या घटनेत महिला शेतकरी भावना भाऊराव यावलकर यांचे जवळपास 5 लाखाहून अधिकचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच कृषी व महसूल विभागाकडून पंचनामा करण्यात आला आहे. तर दुसरीकडे या घटनेची तक्रार डुग्गीपार पोलिसात नोंद करण्यात आली. सौंदड येथे भावना भाऊराव यावलकर यांची शेती आहे. मध्यरात्री अचानक शेतातील झाडे आगीच्या स्वाधीन झाल्याचे दिसून आले.

लाखो रुपयांचे नुकसान

या घटनेची माहिती मिळताच शेतकरी कुटुंब आग विझविण्याच्या कामात लागला. त्याचबरोबर गावातील नागरिकांनी आगीला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात येण्यापूर्वीच ही झाडं जळाली. जवळपास 130 झाडे जळून खाक झाली. यामध्ये लाल चंदन- 47, पांढरा चंदन- 27, आंबा 28, फणस – 3, लिंबू- 2, रामफळ 1, संत्री – 19, चिकू-3 व सैतुचा एका झाडाचा समावेश आहे. तसेच 1400 मीटर ड्रीपची पाईपलाईनसह इतर साहित्याची राखरांगोळी झाली. या घटनेत जवळपास 5 लाखांहून अधिकचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच अज्ञात आरोपीविरुद्ध डुग्गीपार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

नुकसान कसं भरून निघणार?

मुंडीपार शिवारात ही झाडं लावण्यात आली होती. झाडं जगवणं खूप कठीण असते. सरकार करोडो झाडं लावते. पण, ही झाडं जगत नसल्याचा अनुभव आहे. फारच कमी झाडं मोठी होतात. या शेतातील झाडं मोठ्या मेहनतीनं लहानाची मोठी करण्यात आली. पण, कुणीतरी आग लावली. यात सर्व नुकसान झालं. या आगीत शेताचं मोठं नुकसान झालं. याचा पंचनामा केला जाईल. पण, झालेलं नुकसान भरून काढणं खूप कठीण आहे. चंदनाची झाडं खूप महाग असतात. शिवाय या सर्व झाडांपासून फळ मिळत होती. ती आता मिळणं बंद होईल. शिवाय या झाडांपासून मिळणारे ऑक्सिजनची किंमत आपण काढू शकत नाही.