पंकजा आणि प्रीतमला पण मुलगा, भुजबळांंना आगाऊपणा कोणी सांगितला? मुंडेंच्या राजकीय वारसदाराच्या मुद्द्यावर प्रकाश महाजनांनी कानच उपटले

बीड सभेतील छगन भुजबळांच्या विधानावरून मुंडे कुटुंबातील वारसा वादाला तोंड फुटले आहे. भुजबळ यांनी धनंजय मुंडे यांना गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार घोषित केले होते, ज्याला करुणा मुंडेंनी पाठिंबा दिला.

पंकजा आणि प्रीतमला पण मुलगा, भुजबळांंना आगाऊपणा कोणी सांगितला? मुंडेंच्या राजकीय वारसदाराच्या मुद्द्यावर प्रकाश महाजनांनी कानच उपटले
| Updated on: Oct 23, 2025 | 1:43 PM

बीडमध्ये झालेल्या ओबीसींच्या महाएल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारस हे धनंजय मुंडेच असल्याचे विधान केले होते. या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना तोंड फुटले. आता याच मुद्द्यावर करुणा मुंडे यांनी भुजबळांच्या मताला दुजोरा देत धनंजय मुंडे यांच्या राजकीय संघर्षाचे कौतुक केले. ‘राजकारण हे पोटचा वारसा नसून विचारांचा वारसा असतो आणि धनंजय मुंडे यांनी ते सिद्ध केले आहे,’ असे करुणा मुंडे म्हणाल्या होत्या. आता यावर प्रकाश महाजन यांनी तीव्र आक्षेप घेत संताप व्यक्त केला आहे. करुणा मुंडे कोण? त्यांना त्यांची मर्यादा माहिती नाही का? घरातील वडिलधारी माणसं आहेत, ते ठरवतील, असे स्पष्ट मत प्रकाश महाजन यांनी व्यक्त केले. ते संभाजीनगरमध्ये बोलत होते.

प्रकाश महाजन यांनी नुकतंच टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी करुणा मुंडे आणि छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. छगन भुजबळ गोपीनाथ मुंडेंना जवळचे मित्र मानत असले तरी ते आता तलाठ्याच्या भूमिकेत काम करत आहेत का, असा प्रश्न प्रकाश महाजन यांनी व्यक्त केला. गोपीनाथरावांनी वडिलोपार्जित जमीन पुतण्याला दिली, पण भुजबळांना मुंडे कुटुंबाचा वारस डिक्लेअर करण्याचा अधिकार कुणी दिला, असा सवाल त्यांनी केला. घरात अजून चार ज्येष्ठ सदस्य हयात असताना भुजबळांनी आगाऊपणा करू नये, असे प्रकाश महाजन म्हणाले.

मिठाचा खडा टाकण्याचे काम करत आहे

यावेळी प्रकाश महाजन यांनी करुण शर्मांवरही निशाणा साधला. ज्यांना त्या आपले पती मानतात, त्या पतींची अब्रू वेशीवर टांगतात. तसेच मुंडे आडनाव नसते तर लोकांनी घरात दगड टाकले असते, अशा कठोर शब्दांत त्यांनी करुणा मुंडे यांच्यावर टीका केली. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोन्ही बहीण-भाऊ नुकतेच एकत्र आले असताना, भुजबळ आणि करुणा मुंडे मिठाचा खडा टाकण्याचे काम करत आहेत, असेही महाजन यांनी म्हटले.

भुजबळांच्या आणि करुणा मुंडेंच्या म्हणण्याने वारस बदलत नाही

पंकजा मुंडे स्त्री असून राजकारणात तिला काही मर्यादा असतात. त्या सभेला आल्या नाहीत म्हणून जाहीर करून टाकणे हे तलाठ्यापेक्षा पुढे आहे. भुजबळांनी हे करणे बरोबर नाही. भुजबळांच्या आणि करुणा मुंडेंच्या म्हणण्याने वारस बदलत नाही. धनंजय मुंडे किंवा पंडित अण्णांचा मुलगा वारस होऊ शकतो. पंकजा आणि प्रीतमला पण मुलगा आहे, ते पाहतील काय करायचं ते? असेही प्रकाश महाजन यांनी सांगितले.

मी माझ्या भाचीवर (पंकजा मुंडे) प्रेम करतो, दुसऱ्याला वाईट वाटायचे कारण नाही. गोपीनाथरावांचा पुढील वारसा कोण असेल हे ठरवण्यासाठी पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे आणि कुटुंबातील ज्येष्ठ लोक सक्षम आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. या वादामुळे मुंडे कुटुंबातील वारसा आणि राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.