
नागपूर | 6 नोव्हेंबर 2023 : महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींच्या निकालाचे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत शिवसेना-भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यात मतदारांनी भरभरुन यश दिले आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांना चांगलाच फटका बसला आहे. परंतु विदर्भातील निकाल अधिकच धक्कादायक आहे. विदर्भात तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्ष म्हणजे बीआरएसने चांगलेच यश मिळवले आहे. या पक्षाने काँग्रेसला धक्का दिला आहे. विदर्भातील ग्रामपंचायत निवडणुकीत के सी राव यांच्या बीआरएस पक्षाने नऊ पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला आहे. नाना पटोले यांच्या भंडार जिल्ह्यात राव यांच्या पक्षाने दमदार कामगिरी केली आहे.
केसी राव यांनी काही महिन्यांपूर्वी मराठवाडा आणि विदर्भात सभा घेतल्या. त्यांच्या या सभांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर शेतकऱ्यांच्या कांद्याला त्यांनी चांगले दर मिळवून दिले. के.सी. राव यांच्या झालेल्या सभानंतर ही पहिलीच निवडणूक होती. या निवडणुकीत त्यांच्या पक्षाने चांगली कामगिरी केली. त्याचा उल्लेख भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही केला. बीआरएस पक्षाच्या फटका काँग्रेसला बसला आहे. परंतु भविष्यात भाजपसाठीही हा पक्ष धोक्याची घंटा होऊ शकतो. यामुळे बीआरएस महाराष्ट्रातही आपले पाय पसरवणार असल्याचे या माध्यमातून दिसून आले.
लोकांनी माझ्यावर विश्वास टाकून सदस्य नोंदणी चांगली केली. राज्य सरकारने विकास केवळ टीव्ही आणि मीडियाच्या माध्यमातून केला आहे. प्रत्यक्षात ग्राउंड लेव्हलला विकास झालेला नाही. आमचा कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांनी ग्राऊंड लेव्हला प्रचंड काम केले आहे. त्यामुळे मतदारांनी आमच्यावर विश्वास टाकाला आहे. त्याचा परिणाम हा निकाल आहे, असे भारत राष्ट्र समितीचे विदर्भ समन्वयक माजी आमदार चरण वाघमारे यांनी म्हटले आहे.