
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवतीर्थवर जाऊन मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरे बंधूंच्या कौटुंबीक भेटीनंतर ही पहिलीच राजकीय भेट होती. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल सव्वा दोन तास चर्चा झाली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि संजय राऊत देखील उपस्थित होते. उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना दसरा मेळाव्याचं निमंत्रण देण्यासाठी गेले होते, आणि या दसरा मेळाव्यात युतीची घोषणा होऊ शकते अशी देखील आता चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान आज झालेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, या भेटीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी ठाकरे बंधूंंना खोचक टोला लागवला आहे. दोन राजकीय नापास लोक एकत्र आल्याने राजकीय यश मिळत नाही, असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. बंजारा समाज, धनगर समाज, कैकाडी समाज आणि ओबीसीतील छोटे घटक असतील त्यांना त्रास दिला जात आहे. मनोज जरांगे पाटील यांनी एक शासन निर्णय आणायला लावला, तो कसा संविधानविरोधात आहे, याबाबत महसूल मंत्री बावनकुळे यांची भेट घेतली. महसूलमंत्र्यांसोबत यावर चर्चा केली. एक भीती दाखवली जाते आहे, ओबीसींना भीती दाखवली जात आहे, प्रमाणपत्र आमच्या दमावर मिळू असं म्हटलं जात आहे. महसूल अधिकारी एका विशिष्ट समाजाच्या मनी पावरला घाबरत आहेत असा आरोपही यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. मी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विनंती केली की तातडीनं पाउलं उचला अन्यथा आम्ही कोर्टात जाऊ, असा इशाराही यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आता वातावरण तापण्याची शक्यता आहे.