दीनानाथ रुग्णालय अन् 10 लाखांच्या मागणी प्रकरणावर आरोग्य मंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गरोदर महिलेवर उपचार करण्यासाठीचा खर्च म्हणून 10 लाख रुपये मागितल्याचा आरोप केला जात आहे. या महिलेचा नंतर मृत्यू झाला आहे.

दीनानाथ रुग्णालय अन् 10 लाखांच्या मागणी प्रकरणावर आरोग्य मंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
prakash abitkar and deenanath mangeshkar hospital
| Updated on: Apr 04, 2025 | 6:45 PM

Deenanath Mangeshkar Hospital : पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तनिषा भिसे नावाच्या गरोदर महिलेवरील उपचार खर्च म्हणून 10 लाख रुपयांची मागणी केल्यानंतर हे रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या महिलेला नंतर अन्य रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र त्या महिलेचा नंतर दुर्दैवी मृत्यू झाला. याच कारणामुळे आता या रुग्णालयावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. त्यानंतर आता राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या प्रकरणावर पहिल्यांदाच भूमिका मांडली आहे. त्यांनी आता या प्रकरणात नेमकी काय कारवाई होईल, याबाबत सांगितले आहे.

डॉक्टरांनी अगोदर उपचार केले पाहिजेत

पुण्याच्या मंगेशकर रुग्णालयात रुग्णाला त्रास झाला. रुग्णालयात उपचार करण्याऐवजी त्याला दुसरीकडे पाठवण्यात आलं. या प्रकारामुळे जी दुर्दैवी घटना घडली, त्यामुळे साहजिकच लोकांच्या मनात तीव्र रागाची भावना आहे. ही फारच खेदाची बाब आहे. लोक उपचारासाठी जेव्हा येतात, तेव्हा त्यांच्यावर डॉक्टरांनी अगोदर उपचार केले पाहिजेत. परंतु दुर्दैवाने या घटनेत रुग्णांच्या नातेवाईकांनाही खूप त्रास झाला. या रुग्णालयाच्या कामकाजाबद्दलही अनेक तक्रारी येत आहेत.

चौकशी करण्याचा आदेश दिला आहे

“ही घटना घडल्यानंतर समाजमाध्यम, लोकांमध्ये तीव्र भावना आहेत. त्यांतर आरोग्य विभागाच्या वतीने पुण्यातील आरोग्य विभागाच्या उपसंचालकांना सूचना दिलेल्या आहेत. या रुग्णालयात झालेल्या घटनेबाबत तसेच झालेल्या चुकीबाबत योग्य ती चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. तसेच चौकशीअंती जो अहवाल येईल, त्यानुसार रुग्णालयावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केले.

दोन्ही कायद्यांचे नियम बघीतले जातील, त्यानंतर मग…

“सगळ्यांना त्यांचं मत मांडण्यासाठी वेळ द्यायला हवा. सर्वांचे मत मांडून झाल्यानंतर आरोग्य विभागाच्या नियमांनुसार कारवाई होईल. बॉम्बे नर्सिंग अॅक्टनुसार तसेच पब्लिक ट्रस्ट अॅक्टनुसारही या रुग्णालयाचे काम चालते. त्यामुळे या दोन्ही कायद्यांचे नियम बघीतले जातील. या दोन्ही नियमांचे उल्लंघन असले किंवा घटनाक्रम असेल याबाबतच्या चौकशीनंतर जे समोर येईल, त्यानुसार कारवाई केली जाईल,” अशी माहिती अबिटकर यांनी दिली.