दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई कधी? आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले उत्तर

चौकशी समितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल तर त्यावर योग्य ते आदेश तिन्ही अहवाल आल्यानंतरच दिले जाईल. सगळ्यांचा आग्रह हा ज्या पद्धतीने रुग्णाला त्रास झाला आहे, दिरंगाई झाली असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी, असा आहे. परंतु वास्तुस्थिती बघूनच कारवाई होईल.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई कधी? आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले उत्तर
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
| Updated on: Apr 18, 2025 | 12:33 PM

पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयच्या अडचणीमुळे गर्भवती महिला तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात विविध समित्यांकडून रुग्णालयाची चौकशी सुरु आहे. यामुळे मंगेशकर रुग्णालय प्रशासन अडचणीत आले आहे. या घटनेनंतर राजकीय पक्ष, सामाजिक संस्थांकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. या रुग्णालयावर कारवाई कधी होणार? याबाबत आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रथमच भाष्य केले आहे.

तिन्ही अहवाल आल्यावर कारवाई

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, मंगेशकर रुग्णालयाची चौकशी तीन विभागाकडून करण्यात येत आहे. हे रुग्णालय धर्मदाय कायद्यातील तरतुदीनुसार सुरु झाले आहे. यामुळे राज्याच्या कायदा विभागाकडूनही चौकशी करण्यात येत आहे. दुसरी चौकशी राज्याच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. तिसरी चौकशी पुण्यातील ससून रुग्णालयाकडून होत आहे. या तिन्ही विभागाचा अहवाल आल्यावर रुग्णालयावर कारवाई केली जाईल. मंगेशकर रुग्णालय असो की इतर कुठलेही रुग्णालय असो त्या ठिकाणी अनियमता होऊ नये किंवा रुग्णास त्रास होऊ नये, हे पाहिले जाईल.

प्रकाश आबिटकर यांनी चौकशी समितीसंदर्भातील विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सांगितले की, चौकशी समितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल तर त्यावर योग्य ते आदेश तिन्ही अहवाल आल्यानंतरच दिले जाईल. सगळ्यांचा आग्रह हा ज्या पद्धतीने रुग्णाला त्रास झाला आहे, दिरंगाई झाली असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी, असा आहे. परंतु वास्तुस्थिती बघूनच कारवाई होईल. तिन्ही अहवालातून सत्यता समोर येईल. पुढील दोन ते तीन दिवसात अहवाल येईल. त्यावर कारवाई संदर्भात सूचना मिळतील. त्यानंतरच कारवाई होईल, असे त्यांनी सांगितले.

विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला दणदणीत विजय मिळालेल्या आहे. त्यापेक्षा मोठे प्रमाणपत्राची गरज नाही. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जनतेने विश्वास ठेवलेला आहे. शिवसेनेचे संघटन अतिशय मजबूत आहे. त्यांच्या पाठीमागे लाखो कार्यकर्ते आहेत. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे, हे सुद्धा या निवडणुकीत आपण पाहिले आहे. शिवसेनेत रोज पक्षप्रवेश होत आहे. संघटनेची शक्ती वाढत आहे, असे मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नाशिकमधील शिवसेना उबाठाच्या मेळाव्यातील प्रश्नावर बोलताना सांगितले.