शासकीय सेवेत राहून खासगी प्रॅक्टिस करणार्या डॉक्टरांना घरी बसवणार, आरोग्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश
शासकीय सेवेत राहून खासगी प्रॅक्टिस करणार्या डॉक्टरांना घरी बसवणार, असा इशारा आरोग्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. आरोग्यमंत्री आबिटकर यांच्या आदेशाने खळबळ उडाली आहे.

सोलापूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनागोंदी कारभारावरून आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांची गैरहजेरी, प्रसुती टाळून रुग्णांची होणारी परवड , अत्यावश्यक औषधांचा तुटवडा अशा विविध कारणाने ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या निदर्शनास आलं. या कारभारावरून आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य प्रशासनाची कानउघडणी केली आहे. शासकीय सेवेत असताना खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या कामचुकार डॉक्टरांना थेट घरी बसवा, असा इशारा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिला. कामचुकारांच्या जागी नवीन तरुणांना संधी देऊ, असंह त्यांनी म्हटलं.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोलापूर-सांगली आरोग्य जनसंवाद यात्रा आढावा बैठक झाली. या बैठकीला खासदार ज्योती वाघमारे, उत्तमरव जानकर, आमदार अभिजीत पाटील इत्यादी नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर गैरहजर वैद्यकीय अधिकारी रडारवर आले आहेत. सोलापुरातील या बैठकीत वडाळा ग्रामीण रुग्णालयात दररोज सुमारे 100 रुग्णाची बाह्यरुग्ण तपासणी असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांची गैरहजेरी दिसून येते. ही तक्रार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी मांडली. पिंपळनेरमधील आरोग्य केंद्रातही संबंधित डॉक्टरांचे वर्तन असंच होतं, असं अण्णा ढोणे यांनी लक्ष वेधलं. तुम्ही डॉक्टर म्हणून काम करताय की फक्त गणवेश घालून बसला आहात? असा सवाल देखील या बैठकीत विचारण्यात आला.
प्रकाश आबिटकर हे निष्क्रिय डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारणार आहेत. शासकीय सेवेत राहून खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांवरही कारवाईचे आदेश दिले आहेत. कामचुकार डॉक्टरांना सेवेतून थेट घरी बसवण्याचा इशारा दिला आहे. गैरहजर डॉक्टरांची तातडीने चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले. सोलापूरमधील आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत आबिटकर आक्रमक झाल्याचे दिसून आले. रुग्णसेवेत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. बोगस डॉक्टरांवर आठ दिवसांत धडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. प्रणिती शिंदे यांनी केलेल्या आरोपावर आबिटकर यांनी म्हटलं की, याआधीही राज्यात 710 गैरहजर डॉक्टरांना नोटिसा, त्यापैकी 442 जणांवर कारवाई आणि 58 डॉक्टरांची सेवा समाप्त करण्यात आल्याची माहिती आबिटकर यांनी विधानपरिषदेत दिली होती. त्यात डायलेसीस सेंटरबाबत त्या कंपनीचे केंद्रातील दायित्व वाढले आहे. केंद्राकडे निधीची मागणी केलीय तो उपलब्ध होईल. निधी उपलब्ध झाला नसला तरी सेवा कुठेही बंद पडू नये याबाबत कंपनीला सांगितले आहे. सगळीकडे सेवा सुरु आहे, महालॅबच्या बिलाबाबत केंद्राकडे पाठपुरावा सुरू आहे’.