मुंबईत रिमझिम, कोकणला रेड अलर्ट, राज्यात पावसाचा जोर कायम राहणार

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. मुंबईतही रात्रभर रिमझिम पाऊस सुरू होता. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील कंडारी, वंजारवाडी आणि आसपासच्या परिसरात शनिवारी रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला.

मुंबईत रिमझिम, कोकणला रेड अलर्ट, राज्यात पावसाचा जोर कायम राहणार
जालना जिल्ह्यात झालेला मुसळधार पाऊस
| Updated on: Jun 15, 2025 | 7:34 AM

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात मान्सून सक्रीय झाला आहे. राज्यातील सर्वच भागात पावसाचे आगमन झाले आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. मुंबईतही रात्रभर रिमझिम पाऊस सुरू होता. रविवारी सकाळीही मुंबईत पाऊस सुरु झाला. रविवारी आणि सोमवारी कोकणातील सर्वच जिल्ह्यांत पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. हवामान विभागाने कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच मध्य, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भासाठी दोन दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे. मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट आहे.

राज्यात २० जूनपर्यंत पावसाचा जोर असणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह रविवारी पाऊस पडणार आहे. मुंबईसह उपनगरात तसेच ठाणे,कल्याण- डोंबिवली, विरार वसई येथे देखील पाऊस सुरू आहे. मुंबईला पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. ठाणे, पालघर , रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली परिसरात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने संध्याकाळी अचानक विजेच्या कडकडाटासह मुसळधार सरी बरसल्या. या अनपेक्षित पावसामुळे नागरिकांची मोठी धावपळ झाली. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षिततेची खबरदारी घेण्याची गरज आहे.

  • कोकणात रेड अलर्ट 15, 16 जून
  • मध्य, उत्तर महाराष्ट्रात आणि पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथा भागात 15, 16 जून रोजी ऑरेंज अलर्ट
  • विदर्भात 15 ते 18 जून दरम्यान यलो अलर्ट

जालना जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील कंडारी, वंजारवाडी आणि आसपासच्या परिसरात शनिवारी रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले. पुलावरून पाणी वाहत असल्याने बदनापूर ते कंडारी रस्त्यावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. जोरदार पावसाने या भागातील नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत.