
Rain in Winter: हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे राज्यातील काही भागांत शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शेती पिकांचे नुकसान होणार आहे. नंदुरबार आणि अकोला जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. उत्तर महाराष्ट्रासह नंदुरबार जिल्ह्यात हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला होता.
नंदुरबार जिल्ह्यातील काकळदा परिसरात शुक्रवारी दुपारी तुफान पाऊस झाला. अर्ध्या तासापासून जास्त वेळ झालेल्या या पावसामुळे रस्त्यावरुन पाणी वाहू लागले. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली. अकोला जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. अकोला जिल्ह्यातील अकोला, तेल्हारा, अकोट, बाळापूर आणि पातूर तालुक्यात पाऊस झाला.
जळगाव जिल्ह्यातही अवकाळी पाऊस झाला. हवामान खात्याने पावसा बाबत आधीच अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील काही भागांत दुपारी रिमझिम पावसाला सुरुवात झाली. मात्र 2.55 वाजता पावसाने जोर पकडला. जळगाव शहरात जोरदार पाऊस बरसला. नाशिकच्या निफाड तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पिंपळगाव बसवंत, कसबे सुकेने, खेरवाडी आणि चांदोरी गाव व परिसरात पाऊस झाला.
धुळ्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरात अवकाळी पावसाला सुरुवात झाली. शिरपूर, शिंदखेडा येथे रिमझिम पाऊस झाला. नाशिकच्या निफाड तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पिंपळगाव बसवंत, कसबे सुकेने, खेरवाडी आणि चांदोरी गाव व परिसरात पाऊस झाला.
राज्यात हिवाळ्यात पडलेल्या अवकाळी पावसाचा फटका शेत पिकांना बसला आहे. या पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. पावसामुळे आंबा, गहू, हरभरा, ज्वारी, मका या पिकांचे प्रचंड नुकसान होणार आहे. याआधीच शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. आता वरून राजा बरसल्याने शेतकरी अजून अडचणीत सापडणार आहे.
भारतीय हवामान विभागाने राज्यात 27 आणि 28 डिसेंबर रोजी वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. काही ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला.
हवामान शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर यांनी सांगितले की, उत्तरेकडून थंडे वारे येत आहे. बंगालच्या उपसागारात गरम वारे येत आहे. या दोन्ही वारांचा संगम महाराष्ट्रात होत आहे. त्यामुळे राज्यात पाऊस पडत आहे. राज्यातील मध्य उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात गारपीट आणि पाऊस पडणार आहे. पुणे जिल्ह्यात पाऊस असणार आहे. २८ तारखेनंतर पावसाची तीव्रता कमी होईल, असा अंदाज आहे. कोकणात ढगाळ वातावरण असणार आहे. मुंबई, पालघरमधील ढगाळ वातावरण असणार आहे. नांदेड, सोलापूर, सातारा, कोल्हापूर या भागांत ढगाळ असणार आहे.