Nagar Parishad election Result 2025 : शिंदे गट, ठाकरे गट एकत्र येताच घडला नवा इतिहास, 55 वर्षांची भाजपाची सत्ता उलथवून लावली!
महाराष्ट्रात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीतील विटा नगरपरिषदेत इतिहास घडला आहे. येथे भाजपाच्या 55 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागला आहे.

Vita Nagar Parishad Election Result : राज्यात नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर केला. या निवडणुकीत भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. तर विदर्भ आणि इतर काही ठिकाणी काँग्रेस तसेच महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी काही नगरपरिषदांची निवडणूक जिंकली आहे. या निवडणुकीत सरशी मिळाल्यामुळे भाजपाने मतदारांचे आभार मानले आहेत. तर ठाकरे गटाने मतदानाच्या प्रक्रियेवर आक्षेप घेऊन पुन्हा एकदा सत्ताधारी तसेच निवडणूक आयोगाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, या निवडणुकीत सांगलीच्या विटा नगरपरिषदेच्या निवडणूक निकालाची सर्वाधिक चर्चा होत आहे. या निवडणुकीत सांगलीच्या विटा नगरपरिषदेत नवा इतिहास घडला आहे. विटा नगरपरिषदेत शिवसेनेच्या शिंदे गटाचा दमदणीत विजय झाला आहे. येथे भाजपाच्या 55 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागला आहे. त्यामुळे या विजयाची महाराष्ट्रभरात चर्चा होत आहे. कारण या निवडणुकीत शिंदे गटाला ठाकरे गट, काँग्रेस, शरद पवार गटाने पाठिंबा दिला होता.
विटा नगरपरिषदेत नेमकं काय घडलं?
सांगलीच्या विटा नगरपरिषदेवर अखेर शिवसेना शिंदे गटाचा भगवा फडकला आहे. विटा नगरपरिषदेत माजी आमदार व भाजपाचे नेते सदाशिव पाटील यांच्या 55 वर्षाच्या सत्तेला सुरुंग लागलेला आहे. येथे सत्तांतर घडवत शिवसेना शिंदे गटाने निर्विवाद सत्ता मिळवली आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतदेखील शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली असून काजल म्हेत्रे यांचा दणदणीत विजय झाला आहे. दुसरीकडे नगरसेवक पदाच्या निवडणुकीत 26 पैकी 22 जागांवर शिवसेना शिंदे गटाने विजय मिळवला. तर भाजपाला अवघ्या चार जागांवरच समाधान मानावे लागले आहे. विटा नगरपरिषदेसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपा अशी दुरंगी लढत झाली होती. शिवसेना शिंदे गटाला राष्ट्रवादी शरद पवार गट,काँग्रेस ,शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा मिळाला होता. शिवसेना शिंदे गटाने विटा नगर परिषदेवर आपला भगवा फडकवला आहे.
महानगरपालिकेच्या निवडणुकीवर परिणाम पडणार?
दरम्यान, महाराष्ट्रात इतरही काही ठिकाणी अशाच प्रकारे आश्चर्यकारक निकाल आले आहेत. विदर्भात काँग्रेसला चांगले दिवस आल्याचे दिसत आहे. तर भाजपाची या ठिकाण पिछेहाट झाली. या निकालाचा परिणाम आता आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीवर होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
