निवडणुकीत भाऊ, बहीण, भावजयीचा दणदणीत विजय, अख्ख्या कुटुंबाचा डंका; अजब विजयाची महाराष्ट्रभर चर्चा!
Karmala Election Result : करमाळ्यातील निकालाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. या निवडणुकीत एकाच घरातील 3 उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे. यात भाऊ, बहीण आणि भावजईचा समावेश आहे.

राज्यातील नगर पालिका आणि नगर परिषदांचे निकाल जाहीर होत आहेत. राज्यातील बहुतांशी ठिकाणी महायुतीने विजय मिळवला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात जल्लोषाचे वातावरण आहे. महायुतीने 200 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवला आहे. अशातच आता सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यातील निकालाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. या निवडणुकीत एकाच घरातील 3 उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे. यात भाऊ, बहीण आणि भावजईचा समावेश आहे. त्यामुळे या निकालाची संपूर्ण राज्यात चर्चा सुरू आहे. करमाळ्यातील निकालावर एक नजर टाकूयात.
एकाच घरातील तिघांचा विजय
करमाळा नगरपालिका निवडणुकीत नगरसेवक पदासाठी भाऊ, बहीण, भावजयीने विजय मिळवला आहे. लता घोलप, सचिन घोलप आणि निर्मला गायकवाड यांनी भारतीय जनता पार्टीकडून विजय मिळवला आहे. या विजयानंतर भाऊ, बहीण व भावजय यांनी एकत्रित येत जल्लोष साजरा केला. या निकालाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे.
करमाळ्यात भाजप-शिवसेनाला धक्का
करमाळ्यात भाजप व शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पराभूत झाला आहे. शिवसेना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या पत्नी महानंदा जगताप व भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनीता देवी पराभूत झाल्या आहेत. करमाळा नगरपालिका निवडणुकीत करमाळा शहर विकास आघाडीने विजय मिळवला आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत करमाळा शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोहिनी संजय सावंत यांनी शानदार विजय मिळवला आहे. आता जेसीबीतून गुलाल उधळत करमाळा शहर विकास आघाडीकडून आनंद साजरा केला जात आहे.
मोहिनी सावंत काय म्हणाल्या ?
या विजयानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष मोहिनी सावंत यांनी म्हटले की, ‘हा माझा एकटीचा विजय नसून करमाळा शहराचा विजय आहे. हा विजय सर्व जनतेचा आहे, त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून जो पाठिंबा दिला त्यांचे आभार व्यक्त करते. हा सत्याचा विजय झाला आहे. करमाळा शहराचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास आहे आणि सर्व जनतेचा पाठिंबा आम्हाला असाच लाभो. सर्व मतदार जनतेचे मी आभार मानते, प्रत्येक मतदारांचा सर्व समस्या मी सोडवेल.
