मुसळधार पाऊस झोडपणार, मुंबईसह या जिल्ह्यांमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर; वाचा…

School Holiday : उद्याही राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. याबाबत संबंधित जिल्ह्यांमधील जिल्हाधिकाऱ्यांना आदेश जारी केले आहेत.

मुसळधार पाऊस झोडपणार, मुंबईसह या जिल्ह्यांमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर; वाचा...
School Holiday 6-7-2026
Image Credit source: Google
| Updated on: Jul 06, 2026 | 10:24 PM

राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे मुंबई आणि लगतच्या भागातील नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमुळे अनेकांचा जीवही गेला आहे. अशातच आता उद्याही राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. याबाबत संबंधित जिल्ह्यांमधील जिल्हाधिकाऱ्यांना आदेश जारी केले आहेत. उद्या कोणत्या जिल्ह्यांमधील शाळा बंद असतील ते सविस्तर जाणून घेऊयात.

ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी

भारतीय हवामान विभागाकडून 7 जुलैसाठी ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्या जिल्ह्याच्या विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता आहे. तसेच पावसामुळे झाडे पडणे, वाहतुकीत अडथळे आणि आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती त्यामुळे उद्या 7 जुलै रोजी सर्व अंगणवाड्या, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आदेश जारी करण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यातील 5 तालुक्यातील शाळा बंद

नाशिकमध्ये उद्या हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, दिंडोरी, दिंडोरी सह ग्रामीण भागात अतिवृष्टीची शक्यता त्यामुळे प्रशासनाने नाशिक ग्रामीण, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, दिंडोरी या 5 तालुक्यांतील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. या भागांतील आठवडे बाजारही बंद राहणार आहेत. त्याचबरोबर नाशिक महापालिका हद्दीतील सर्व शाळादेखील उद्या बंद राहणार आहेत.

पालघर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर

पालघर जिल्ह्यालाही मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे, उद्याही जिल्ह्याच्या अनेक भागांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रक जारी करत याबाबत माहिती दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील काही शाळांना सुट्टी जाहीर

पुणे जिल्ह्याच्या काही भागाला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मावळ, मुळशी, भोर, वेल्हा आणि आंबेगाव तालुक्यातील म्हणजेच सह्याद्री घाट परिसरातील शाळा उद्याही बंद राहणार आहेत. मात्र, इतर तालुके आणि पुणे शहरातील शाळा मात्र उद्या सुरूच राहणार आहेत. नवी मुंबई महापालिका परिसरातील शाळांनाही उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील शाळाही उद्या बंद राहणार आहेत.

मुंबईतील सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा व महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर

भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगराला मंगळवार, दिनांक 7 जुलै 2026 रोजी मुसळधार पावसाचा तसेच सोसाट्याचे वारे वाहतील, असा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा आणि महाविद्यालयांना उद्या, मंगळवार, दिनांक 7 जुलै 2026  रोजी सुटी जाहीर करण्यात येत आहे.

तथापि, आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 1916 या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच, प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Follow Us