कुठे ब्रेक फेल, कुठे ट्रक ओढ्यात कोसळला, तर कुठे कार झाडावर चढली; दोन दिवसात 4 दगावले
गेल्या सहा दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची स्थिती गंभीर बनली आहे. पाणी साचलेले रस्ते, वाहून गेलेले पूल आणि खराब दृश्यमानतेमुळे वाहन अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दोन दिवसांत बीड, जळगाव, पनवेलसह विविध ठिकाणी झालेल्या विचित्र अपघातांमध्ये चार जणांनी आपला जीव गमावला आहे.

गेल्या सहा दिवसांपासून राज्यात पावसाने थैमान घातलं आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात पाणी भरलं आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला नद्या नाले भरून वाहू लागले आहेत. रस्ते पाण्यात गेले आहेत. काही ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत. तर अनेक ठिकाणी पूल वाहून गेले आहेत. त्यामुळे रस्त्यावरून वाहने चालवताना सावधगिरी बाळगावी लागत आहे. राज्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या विविध अपघातात चार जणांना प्राण गमवावा लागला आहे.
बीडच्या परळी अंबाजोगाई रोडवर काल झालेल्या अपघातात दोन जागीच ठार झाले आहेत. तर एकजण जखमी आहे. परळी-अंबाजोगाईल रोडवरील कनरेवाडी घाटात हा अपघात झाला. टू व्हीलर आणि फोर व्हीलर गाडीचा अपघात झाला आहे. अंबाजोगाईकडून पलिकडे येत असताना कनेरवाडी घाटात पिकअप आणि टू व्हीलरचा अपघात झाला. या अपघातातील जखमींना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय येथे हलवण्यात आले आहे. अपघातातील तिन्ही युवक हे परळीच्या सावता माळी मंदिर येथील आहे. गणेश मुरुडे आणि मुंजा मिसाळ असं मृतांची नावे आहेत. तर गणेश खोले हा जखमी झाला आहे.
पाचोऱ्यात भीषण कार अपघात
जळगावच्या पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील अरिहंत ऑटोमोबाईलसमोर झालेल्या भीषण कार अपघातात 22 वर्षीय चेतन सुकदेव हटकर याचा मृत्यू झाला. या अपघातात त्याचे दोन मित्र जखमी झाले असून अन्य दोघे सुखरूप बचावले आहेत. कार रस्त्यालगतच्या निंबाच्या झाडावर आदळल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पनवेलमध्ये विचित्र अपघात
तर नवी मुंबईच्या पनवेल येथे काल विचित्र अपघात झाला. एका कारने पाच वाहनांना धडक दिली. कारचा वेग इतका होता की ही कार फुटपाथवर जाऊन आदळली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 7 ते 8 जण जखमी झाले आहेत. या प्रकरणाचा तळोजा पोलीस अधिक तपास करत आहेत.
टँकर घाटात कोसळला
नाशिकच्या येवला-नांदगाव राज्य क्रमांक 25 वरील घाटात दुधाचा टँकर कोसळला. येवल्याच्या मुळुबाई घाटात टँकरचे ब्रेक न लागल्यामुळे हा भीषण अपघात झाला. टँकर घाटात जाऊन पलटी झाल्याने टँकरचे मोठे नुकसान होऊन चालक जखमी झाला आहे. जखमी चालकावर येवल्याच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ट्रक थेट ओढ्यात
सांगलीच्या शिराळा तालुक्यातील भाटशिरगांव येथे ओढ्या मध्ये ट्रक कोसळल्याची घटना घडली आहे. चिरा विटा घेऊन जाणारया ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक थेट ओढ्यात जाऊन पलटी झाला. यामुळे ट्रक चालकासह दोघे जण जखमी झाली आहेत. रत्नागिरीहून शिराळयाकडे निघाला असता रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला आहे. अपघातानंतर चालक हा ट्रक मध्येचे अडकुन पडला होता. ओढ्यातील पाण्याला प्रचंड वेग व पाऊसाची संततधार यामुळे चालकाला बाहेर पडता येत नव्हते. अखेर 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर क्रेनच्या माध्यमातून ग्रामस्थांनी चालकाची सुखरूप सुटक केली. भर पाऊसात हा मदतीचा थरार सुरू होता.