राज्यात पावसाचा हाहाकार, मराठवाड्याला झोडपलं, महाराष्ट्रात कुठे किती पाऊस?

महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलं आहे, पावसाचा सर्वाधिक तडाखा हा मराठवाड्याला बसला आहे, तर उत्तर महाराष्ट्रात देखील अतिमुसळधार पाऊस सुरू आहे, पश्चिम महाराष्ट्रासह कोकण आणि मुंबईत देखील पावसानंं धूमाकूळ घातला आहे.

राज्यात पावसाचा हाहाकार, मराठवाड्याला झोडपलं, महाराष्ट्रात कुठे किती पाऊस?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 28, 2025 | 8:59 PM

महाराष्ट्राला पावसानं चांगलंच झोडपून काढलं आहे, पावसाचा सर्वाधिक तडाखा हा मराठवाड्याला बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात पावसाची संततधार सुरूच आहे. दरम्यान गेल्या 24 तासांपासून मराठवाड्यात पावसाचा जोर आणखी वाढला आहे. तर दुसरीकडे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. कोकण आणि मुंबईतही जोरदार पाऊस सुरू असून हवामान विभागाकडून हाय अलर्ट देण्यात आला आहे. जाणून घेऊयात राज्यातील पावसाची स्थिती.

मराठवाड्यात मुसळधार पाऊस  

मराठवाड्यात गेल्या 24 तासांपासून पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळे जायकवाडी धरणातून सुरू असलेल्या पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे, त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला असून, नदी काठच्या गावांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे.  या पार्श्वभूमीवर नदी काठच्या गावातील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात येत आहे. मराठवाड्यातील जालना, धाराशिव आणि बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक गावाना पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे.

पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा तडाखा

पश्चिम महाराष्ट्रात देखील जोरदार पाऊस सुरू आहे. याचा सर्वाधिक फटका हा सोलापूर जिल्ह्याला बसला आहे, सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. करमाळा तालुक्यातील मांगी तलाव ओव्हर फ्लो झाल्यानं शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. सातारा, सांगली आणि पुण्यामध्ये देखील जोरदार पाऊस सुरू आहे.

दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यालाही पावसानं झोडपून काढलं आहे. जिल्ह्यात ढगफुटी सदृष्य पावसानं हाहाकार उडाला असून, पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकसानग्रस्त स्थितीचा आढावा घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे.  शिर्डीतील साई संस्थानच्या सभागृहात पालकमंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची ही बैठक पार पडली. नाशिकमध्येही पावसाचा जोर वाढला असून, गोदावरी नदीला पूर आला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात अतिमुसळधार पाऊस झाला असून, सावरगाव तेली गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. परिसरातील संपूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे.  शेतकऱ्यांचं मोठे नुकसान झालं आहे. सावरगाव तेली गावाच्या चारही बाजूनं पाण्याचा वेढा आहे. एका बाजूंने  खडकपूर्णा नदीचा महापूर तर दुसऱ्या बाजूनी इतर नद्यांच्या पाण्याचा वेढा पडला आहे.  सावरगाव तेली ते किनगाव जट्टू रस्त्यावरील पूलही पाण्याखाली गेला आहे.