Special Story | संत नामदेवांचे जन्मस्थान, पवित्र ज्योतिर्लिंग, अनेक युद्ध सोसलेल्या हिंगोली जिल्ह्याविषयी ‘या’ गोष्टी माहिती आहेत का ?

| Updated on: Aug 12, 2021 | 9:35 AM

1 मे 1999 रोजी परभणी जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले. त्यातूनच नंतर हिंगोली जिल्हा अस्तित्वात आला. हा जिल्हा औरंगाबादवरून 230 किलोमीटर अंतरावर आहे.

Special Story | संत नामदेवांचे जन्मस्थान, पवित्र ज्योतिर्लिंग, अनेक युद्ध सोसलेल्या हिंगोली जिल्ह्याविषयी या गोष्टी माहिती आहेत का ?
HINGOLI DISTRICT INFORMATION IN MARATHI
Follow us on

मुंबई : मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याचा वेगळा असा एक इतिहास आहे. येथील प्रत्येक जिल्ह्याचे वेगळे अस्तित्व आहे. मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी या भागात निजामांची सत्ता होती. आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये आपण हिंगोली जिल्ह्याबद्दल जाणून घेऊया. (Hingoli district detail information in marathi know about hingoli district history tourist places)

हिंगोली जिल्ह्याबद्दल बोलायचं झालं (Hingoli district detail information in marathi) तर त्याची निर्मिती ही परभणी जिल्ह्यापासून झालेली आहे. 1 मे 1999 रोजी परभणी जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले. त्यातूनच नंतर हिंगोली जिल्हा अस्तित्वात आला. हा जिल्हा औरंगाबादवरून 230 किलोमीटर अंतरावर आहे. एकूण 4526 चौ किमी क्षेत्रफळ असलेला हा जिल्हा असून यामध्ये एकूण पाच तालुके आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील एकूण तालुके

हिंगोली

कळमनुरी

वसमत

औंढा

सेनगाव

हिंगोली जिल्ह्याचा इतिहास

महाराष्ट्रातील सध्याचा मराठवाडा हा भाग सुरुवातीला निजामांच्या अधिपत्याखाली होता. या भागावर निजामांची सत्ता होती. तत्कालीन हैदराबाद संस्थानात हा भाग यायचा. हिंगोली जिल्ह्याला विदर्भाची सीमा असल्यामुळे या भागात निजामांचा लष्करी तळ असायचा. लष्कराचा तळ असल्यामुळे या भागात निजामांनी रुग्णालये बांधली होती. तसेच काही पशूवैद्यकीय दवाखानेसुद्धा उभारले होते. 1803 मध्ये टीपू सुलतान आणि मराठा यांच्यात झालेल्या दोन मोठ्या युद्धाचा अनुभव हिंगोलीकरांनी घेतलेला आहे. त्या काळात हिंगोलीत पलटन, सिरला, टोखखाना, पेंशनपुरा, सदर बाजार अशी काही ठिकाणं प्रसिद्ध होती. मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1956 मध्ये मराठवाड्याची पुनर्बांधणी करण्यात आली. तेव्हा हा भाग मुंबई राज्याला जोडण्यात आला. पुढे 1 मे 1999 रोजी हिंगोली हा स्वतंत्र जिल्हा अस्तित्वात आला.

हिंगोली जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

हिंगोली जिल्ह्यात अनेक चांगली पर्यटनस्थळं आहेत. येथे निजामकालीन भाषेचा लहेजा तसेच अनेक वास्तू पाहायला मिळतील. यातील काही महत्त्वाच्या पर्यटनस्थळांची माहिती आपण पाहूयात.

नागनाथ मंदिर, औंढा नागनाथ- बारा ज्योतिर्लिंगांपैकी औंढा नागनाथ हे एक ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंगाविषयी अनेक आख्यायिका ऐकायला मिळतात. हे मंदिर यादवांच्या काळातील म्हणजेच तेराव्या शतकातील असावे असे सांगण्यात येते. मंदिराचा सर्वात प्रचिन भाग हा चार स्तरात आहे. यामध्ये कीर्तिमुख, गज, अश्व, व नर असा थरांचा क्रम आहे.

संत नामदेवांचे जन्मस्थळ, नरसी, तालुका हिंगोली- संत नामदेवांचे जन्मस्थळ हे नरसी नामदेव म्हणून प्रसिद्ध आहे. नामदेवांचा जन्म 1270 साली याच भागात झाला. या गावाची लोकसंख्या साधारण 8 हजारांच्या जवळपास असून येथे दरवर्षी मोठी जत्रा भरते. राज्य सरकारने या ठिकाणाला पवित्रस्थान तसेच मोठे पर्यटनकेंद्र म्हणून घोषित केलेले आहे. पर्यटकांची सोय व्हावी म्हणून सरकारने येथे अनेक सोयिसुविधा निर्माण केलेल्या आहेत.

श्री मल्लिनाथ दिगंबर जैनमंदिर, तालुका औंढा नागनाथ- हिंगोली शहरापासून जवळपास 35 किलोमीटर अंतरावर हे स्थळ आहे. शिराद शाहपूर या गावी मल्लीनाथ दिगंबर जैन मंदीर वसलेले आहे. या पवित्र मंदिराला पाहण्यासाठी तसेच दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लोक येथे येतात.

सिद्धेश्वर धरण, सिद्धेश्वर- हे एक मोठे आणि विस्तीर्ण असे धरण असून येथे मोठी जैवविविधता पाहायला मिळते. निरनिराळे पक्षी तसेच प्राणी येथे पाहायला मिळतील. या धरणाच्या आजूबाजूला छोटेमोठे डोंगर आहेत. या डोंगराचा भाग पावसाळ्यात अतिशय मनमोहक दिसतो.

नागरी लोकसंख्या 15.18 टक्के, सरासरी साक्षरता 78.17 टक्के

भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार या जिल्ह्याची लोकसंख्या 11,77,345 असून पैकी 6 लाख 6 हजार पुरुष तर 5 लाख 71 हजार स्त्रीया होत्या. येथे 2001-11 या काळात लोकसंख्यावाढीचा दर 19 टक्के होता. नागरी लोकसंख्या 15.18 टक्के तर सरासरी साक्षरता ही 78.17 टक्के होती. या जिल्ह्यात मराठा तसेच बंजारा समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात राहतात.

नरहर कुरुंदकरांचा जन्म याच जिल्ह्यात

या जिल्ह्याची इतरही काही वैशिष्ये आहेत. प्रसिद्ध साहित्यिक नरहर कुरुंदरकर यांचे जन्मस्थळ कुरुंदा हे गाव याच जिल्ह्यातील वसमत तालुक्यात आहे. या जिल्ह्याला मोठी संस्कृतिक विविधता आहे. ती पाहण्यासाठी एकदातरी या जिल्ह्याला भेट द्यायलाच हवी.

इतर बातम्या :

Special Story | औरंगजेबाची राजधानी, ताजमहलची प्रतिकृती, वेरुळ-अजिंठा लेण्यांचं वैभव, जाणून घ्या औरंगाबाद जिल्ह्याच्या माहीत नसलेल्या गोष्टी

special story | नेमगिरीपासून ते संतांच्या भूमीपर्यंत, परभणी जिल्ह्याच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?

(Hingoli district detail information in marathi know about hingoli district history tourist places)