माजी गृहमंत्र्यांवर ED ची धाड, आजी गृहमंत्री म्हणतात…

| Updated on: Jun 25, 2021 | 11:44 AM

"कुणी काहीही मागणी केली तरी चौकशी होत नाही. सीबीआय चौकशीसाठी मात्र राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल" असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

माजी गृहमंत्र्यांवर ED ची धाड, आजी गृहमंत्री म्हणतात...
दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख
Follow us on

पुणे : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. आधी सीबीआयने अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर महिनाभरातच ईडीनेही देशमुखांच्या नागपुरातील घरावर धाड टाकली आहे. त्यानंतर विद्यमान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी प्रतिक्रिया दिली. सर्वांचं लक्ष कोरोनाकडे असायला हवं, चुकीच्या वेळेला चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत, असं वळसे पाटील म्हणाले. (Home Minister Dilip Walse Patil reacts on ED Raids at Anil Deshmukh)

“मी याबाबत जास्त बोलू इच्छित नाही. संबंधित यंत्रणा तपास करत आहे. चुकीच्या वेळेला चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत. सर्वांचे लक्ष कोरोनाकडे असायला हवं. कुणी काहीही मागणी केली तरी चौकशी होत नाही. सीबीआय चौकशीसाठी मात्र राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल” असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

अनिल देशमुखांच्या घरावर छापेमारी

अनिल देशमुख यांच्यावर वसुली आदेशाचा गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. या गुन्हाच्या अनुषंगाने ईसीआयर (Enforcement Case Information Report म्हणजेच ECIR) दाखल करत ईडीने तपास सुरु केला होता. ईडीने आज सकाळी (शुक्रवारी) पावणे आठच्या सुमारास देशमुखांच्या नागपुरातील घरी छापेमारी केली. यावेळी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सीआरपीएफचे जवान मोठ्या प्रमाणात तैनात होते. पाच अधिकाऱ्यांमार्फत हे धाडसत्र सुरु झाले. यावेळी अनिल देशमुख घरी नव्हते, तर त्यांची पत्नी आणि इतर कुटुंबीय उपस्थित होते.

शाळा आणि कॉलेज 15 जुलैपर्यंत बंद

दरम्यान, सवलती दिल्यानंतर पॉझिटिव्ह रेट कमी झाला. मात्र सध्या सुरु असलेले निर्बंध कायम राहतील, असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं. शाळा आणि कॉलेज संदर्भात 15 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री याबाबतचा निर्णय घेतील. लसीकरणाला गती मिळाली आहे, त्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. तिसरी लाट ही चिंतेची बाब आहे. तिसऱ्या लाटेचा धोका आहेच. त्यामुळे नागरिकांनी जबाबदारीने भूमिका घ्यावी. बाहेर पडू नये, पर्यटनाला जाऊ नये, तिसऱ्या लाटेत लहान मुलं जास्त बाधित होऊ शकतील असा अंदाज आहे, असं मत वळसे पाटलांनी व्यक्त केलं.

लग्नात वाढणारी गर्दी चिंतेचा विषय

जास्तीत जास्त मेडिकल सुविधा द्यायचा विचार करत आहोत. लसीकरण वाढवलं पाहिजे. सुपर स्प्रेडर लोकांचा अटकाव करावा लागेल. केंद्र सरकार याबाबत मार्गदर्शन करत आहे. लग्नात वाढणारी गर्दी हा चिंतेचा विषय आहे. कारण तेथून प्रसार अधिक होऊ शकतो. पोलिसांना याबाबत सूचना दिल्या आहेत, मिटिंग घ्यायला सांगितले आहे, अशी माहितीही गृहमंत्र्यांनी दिली. देशात आणि राज्यात नवा विषाणू आढळून आला आहे. डेल्टा प्लस अधिक घातक आहे. लसीकरण झालं तरी धोका होऊ शकतो, याकडे वळसे पाटलांनी लक्ष वेधलं.

संबंधित बातम्या :

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरावर ईडीची छापेमारी

काल अजित पवारांविरोधात CBI चौकशीचा ठराव, आज अनिल देशमुखांवर ED चे छापे

(Home Minister Dilip Walse Patil reacts on ED Raids at Anil Deshmukh)