आठ महिन्यांपूर्वीच लग्न, तरी अंजलीचे शुभमसोबत प्रेमसंबंध; पती गोविंद ठरला अडथळा, धाराशिवमध्ये नको तेच घडलं
Dharashiv murder case : वाशी तालुक्यातील रामकुंड शिवारात कुंथलगिरीच्या डोंगरदरीत गोविंद यांचा मृतदेह आढळला. प्रेमसंबंधात पती अडथळा ठरत असल्याने हत्या केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. नेमकी काय आहे संपूर्ण घटना? पत्नी आणि प्रियकरावर कोणते आरोप करण्यात आले आहेत?

प्रेमप्रकरणात अडथळा ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार धाराशिव जिल्ह्यात उघडकीस आला आहे. अवघ्या आठ महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या २७ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून आणि डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
गोविंद कागदे यांची निर्घृण हत्या
गोविंद शिवाजी कागदे (वय २७) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. ते वाशी तालुक्यातील गोलेगाव येथील रहिवासी होते. गुरुवारी (१९ नोव्हेंबर) दुपारी १२ ते २ वाजण्याच्या सुमारास वाशी तालुक्यातील रामकुंड शिवारात ही घटना घडल्याचे समोर आले आहे. सरमकुंडी ते भूम जाणाऱ्या रस्त्यालगत कुंथलगिरीच्या डोंगरदरीत गोविंद यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते, तर डोक्यात दगड घालून त्यांची हत्या करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
आठ महिन्यांपूर्वी विवाह, तरीही प्रेमसंबंध
विशेष म्हणजे गोविंद आणि अंजली यांचा अवघ्या आठ महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. मात्र, हा विवाह अंजलीच्या इच्छेविरोधात झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर अंजलीचे शुभम सुभाष खोसे याच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण झाल्याचा आरोप आहे. या प्रेमसंबंधात पती गोविंद अडथळा ठरत असल्याने त्याला संपवण्याचा कट रचण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल
गोविंद यांचे चुलत भाऊ ज्ञानेश्वर बाजीराव कागदे यांनी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अंजली गोविंद कागदे आणि शुभम सुभाष खोसे या दोघांनी संगनमत करून गोविंद यांची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) आणि ३(५) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात नेमकी घटना कशी घडली आणि हत्येमागील संपूर्ण कट काय होता, याचा तपास पोलीस करत आहेत.