
आखाती देशांमधील तणावामुळे राज्यासह देशाच्या विविध भागात इंधनाचा तुटवडा जाणवत आहे. अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरसाठी आणि पेट्रोलसाठी रांगा लागल्याचे पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर CNG आणि PNG गॅस पुरवठा कसा सुरळीत करता येईल याबाबत आज राजधानी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीला सगळ्या राज्यांचे पुरवठा मंत्री आणि सचिव यांना निमंत्रण देण्यात आलं होते. राज्याचे अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर बोलताना छगन भुजबळ यांनी मोठी माहिती दिली आहे. ते नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले की, मनोहरलाल खट्टर, हरदीप सिंह पुरी आणि प्रल्हाद जोशी या केंद्रीय मंत्र्यांसह इतर राज्यामधील मंत्री बैठकीला उपस्थित होते. यावेळी PNG जोडणी जास्तीत जास्त करून घेतली पाहिजे यावर त्यांनी भर दिला. PNG जोडणी सक्तीची केली तरच तुम्हाला OC मिळेल असं काही करता येईल का यावर चर्चा झाली.
पुढे बोलताना भुजबळ म्हणाले की, PNG जोडणी ताबडतोब करण्याच्या सूचना मंत्र्यांकडून देण्यात आल्या आहेत. हॉटेल आणि रेस्टॉरंट यांना तातडीने जोडणी करण्यावर भर देण्यात आला आहे. या पाइपलाइन साठी अनेक परवानग्या मागितल्या जातात पण त्या मिळत नसल्याने उशीर होत आहे, त्यामुळे त्या परवानग्या मागीतल्यानंतर मिळाल्या असं गृहीत धरून काम करण्यास सांगितलं आहे. PNG जोडणी ताबडतोब करण्यासाठी बाकी गोष्टी बाजूला ठेवा अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
छगन भुजबळ यांनी पुढे बोलताना सांगितले की, जिथे जिथे PNG सुरू आहे तिथे तेथील लोकांनी तातडीने PNG कनेक्शन घ्यावं असं न केल्यास तीन महिन्यात LPG बंद होऊ शकतो. साडेतीन हजार किलो लिटर केरोसीन महाराष्ट्राकडे आहे. जिथे PNG आणि CNG कमी पोहोचत आहे तिथे केरोसीन (रॉकेल) पोहोचलं पाहिजे, त्याच्या वापराची परवानगी दिली आहे. इतर देशांतून ऑईल येत आहे, आपल्या रिफायनरी देखील जास्तीत जास्त काम करत आहेत. लॉकडाऊन अजिबात लागणार नाही.