Baramati By Election : ..तर उमेदवारी लगेच मागे घेईन, काँग्रेसच्या आकाश मोरे यांचं मोठं वक्तव्य, बारामतीत राजकारण तापलं
Baramati By Election : "शरद पवार म्हणाले की, त्यांना वाटतं ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. "ते अगदी बरोबर आहेत. काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, हायकमांड काय तो निर्णय घेईल. पवार साहेब बोलले ती त्यांची इच्छा आहे"

बारामती विधानसभेची निवडणूक बिनविरोध होणार की नाही हे आज स्पष्ट होईल. काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार आहेत. त्यांना महाविकास आघाडीतील शरद पवार पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. पण काँग्रेसने मात्र आपला उमेदवार उभा केला आहे. काँग्रेसही महाविकास आघाडीचाच भाग आहे. काँग्रेसकडून आकाश मोरे निवडणूक रिंगणात आहेत. त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचीत केली आहे.
“मी कालपासून लोकांच्या भेटीगाठी सुरु केलेल्या आहेत. ग्रामीण भागात उत्साहाचं वातावरण आहे. निवडणूक काँग्रेस लढतेय त्याचा आनंद आहे. आतापर्यंत तरी मी उमेदवार आहे” असं आकाश मोरे म्हणाले. काँग्रेसने उमेदवार मागे घ्यावा यासाठी रोहित पवार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना भेटले. त्यावर आकाश मोरे यांना विचारलं असता ते म्हणाले की, “या बद्दल मला काहीच माहित नाही. वरच्या लेव्हलला काय चाललय. माझी उमेदवारी केंद्रातून आलेली आहे. खर्गे, वेणूगोपाळ, पायलट यांच्या सहीने माझा एबी फॉर्म आलाय”
काय आश्वासन दिलय हे मला माहित नाही
“हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी सांगितला तोच आमचा मुद्दा आहे. अजित पवार विमान अपघात प्रकरणात सरकार गांभीर्याने चौकशी करत नाही. सरकारने गुन्हा दाखल केला तर उमेदवारी मागे घेईन. रोहित पवार यांनी या बाबतीत फार मोठा पाठपुरावा केलाय. सपकाळ साहेबांनी रोहित पवारांना काय आश्वासन दिलय हे मला माहित नाही” असं आकाश मोरे म्हणाले.
सपकाळ साहेब जो निर्णय घेतील तो मान्य
शरद पवार म्हणाले की, त्यांना वाटतं ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. “ते अगदी बरोबर आहेत. काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, हायकमांड काय तो निर्णय घेईल. पवार साहेब बोलले ती त्यांची इच्छा आहे. ते वरती कळवतील. मी युद्धासाठी एका योद्यासारखा तयार बसलोय. सपकाळ साहेब जो निर्णय घेतील तो मान्य असेल. मी काँग्रेसचा अनुशासित कार्यकर्ता आहे”
मी अजून तरी माझ्या उमेदवारीवर ठाम
“उद्या निवडणुकीला सामोरं जावं लागलं तर पवारसाहेबांचं मार्गदर्शन घेणार आहोत. कारण प्रचार कसा करायचा त्यासाठी पवार साहेबांना भेटायला जाणार आहोत. मी अजून तरी माझ्या उमेदवारीवर ठाम आहे. पण वरिष्ठ काय तो निर्णय घेतील” असं आकाश मोरे म्हणाले.