IMD Monsoon Update : पुढील 48 तास धोक्याचे, आणखी एक मोठं संकट, आयएमडीचा हाय अलर्ट

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, यामुळे अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

IMD Monsoon Update : पुढील 48 तास धोक्याचे, आणखी एक मोठं संकट, आयएमडीचा हाय अलर्ट
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 29, 2025 | 6:47 PM

यंदा मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला आहे, मान्सूननं व्यापलेल्या भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. केरळ, महाराष्ट्र आणि गोव्यात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे सामान्य लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत, यामध्ये मोठं नुकसान झालं आहे. यंदा मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा अधिक होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे.

दुसरीकडे एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.आयएमडीनं दिलेल्या माहितीनुसार पुढील 36 ते 48 तासांमध्ये हा कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र होणार असून त्यानंतर तो हळहळू उत्तरेकडे सरकणार आहे, याचा परिणाम म्हणजे जोरदार वादळासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दोन जूनपर्यंत केरळ आणि कर्नाटकच्या किनारी भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग हा ताशी 40-50 किलोमीटर प्रती तास इतका राहण्याचा अंदाज आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, हा कमी दाबाचा पट्टा हळूहळू उत्तरेकडे सरकणार आहे. पुढील 48 तासांमध्ये त्याची दिशा अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मात्र याचा परिणाम म्हणून केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या किनारी भागांमध्ये पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. गोव्याला देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील दोन ते तीन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्राप्रमाणेच केरळ, कर्नाटक आणि गोव्याला देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.तामिळनाडूला देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे,  कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनला देखील अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे.