IMD Monsoon update : महाराष्ट्रात आभाळ फाटणार, पाऊस तांडव करणार, 10 जिल्ह्यांना हवामान विभागाचा थेट मोठा इशारा

राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे, हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

IMD Monsoon update : महाराष्ट्रात आभाळ फाटणार, पाऊस तांडव करणार, 10 जिल्ह्यांना हवामान विभागाचा थेट मोठा इशारा
महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 30, 2026 | 3:54 PM

महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे, पुढील दोन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने दिलेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. विदर्भातील यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर वाशिम, अकोला, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेज अलर्ट जारी करण्यात आला असून,  नागपूर आणि बुलडाणा जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट आहे. पुढील 24  तास विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. 1 ॲागस्टपासून विदर्भातील पाऊस कमी होण्याचा अंदाज आहे,  या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.

दुसरीकडे आज जळगाव जिल्ह्यासाठी देखील हवामान खात्याकडून थेट रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.  जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचू शकतं, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहान जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. विजांचा कडकडाट होत असताना शेतकऱ्यांनी शेतात झाडांचा किंवा विजेच्या खांबांचा आसरा घेऊ नये, सुरक्षित स्थळी राहावे, अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

दरम्यान दुसरीकडे कोकणात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पावसापेक्षा वाऱ्याचाच जोर अधिक वाढला असून, अरबी समुद्रात जोरदार वारे वाहत असल्यामुळे पावसाला काही प्रमाणात अडथळा निर्माण झाला आहे, जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, सध्या किनारपट्टी भागात ताशी 40 ते 45 किमी प्रति तास वेगाने वारे वाहत आहे.

गोंदियाला वादळी वाऱ्याचा तडाखा 

गोंदिया जिल्ह्यातील ​मोरगाव अर्जुनी ​तालुक्यातील वडेगाव बांध परिसरात अचानक आलेल्या भीषण वादळी वाऱ्याने धुमाकूळ घातला आहे. या नैसर्गिक आपत्तीत गावातील अनेक घरांवरील छत व पत्रे उडून गेल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, या दुर्घटनेत 8 जण जखमी झाले आहेत. अचानक सुटलेल्या वेगवान वादळी वाऱ्यामुळे गावात एकच घबराट पसरली. वादळाचा तडाखा इतका तीव्र होता की अनेक झाडे व विजेचे खांब उन्मळून पडले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us