
महाराष्ट्रासह देशाला पावसानं झोडपून काढलं आहे, गेल्या काही दिवसांपासून अतिमुसळधार पाऊस सुरू असून, या पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. दरम्यान अजूनही धोका टळला नसून, आता भारतीय हवामान विभागाकडून (IMD) पुन्हा एकदा हाय अलर्ट देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता हळूहळू चक्रीवादळात बदलत आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार हे चक्रीवादळ उत्तर पश्चिमेच्या किनाऱ्याकडे वेगानं सरकत आहे. सध्या या चक्रीवादळाची गती प्रति तास 63 किमी एवढी नोंदवण्यात आली आहे. मात्र हळुहळु या चक्रीवादळाची गती वाढवून ती प्रति तास 75 किमी पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.
आयएमडीने दिलेल्या नव्या माहितीनुसार हे चक्रीवादळ आज मध्यरात्री ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. या काळात या वाऱ्याचा वेग ताशी 75 किमी एवढा असणार आहे. त्यानंतर पुढील तीन दिवसांमध्ये या वादळाचा वेग कमी होईल असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार या वादळामुळे पुढील पाच दिवस अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, बिहार, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
ओडिशामध्ये पावसाचा जोर वाढणार
दरम्यान ओडिशामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे, पावसामुळे राज्यात मोठं नुकसान झालं आहे. आजही ओडिशामधील जवळपास सर्वच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेच आवाहन करण्यात आलं आहे.
महाराष्ट्रात काय स्थिती?
दरम्यान हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणात रत्नागिरी, सिंधूदुर्ग, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर मध्य महाराष्ट्रात पुणे,सातारा, सांगली, अहिल्यानगर, नाशिक, कोल्हापूरसह अनके जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात देखील पवासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.