कोकण ते मराठवाडा… पावसाच्या तुफान सरी; IMD चा नवा अंदाज आला, या राज्यांनाही अलर्ट

Heavy Rain Alert : IMD ने महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, मुंबई, मराठवाडा, गोवा, केरळ, कर्नाटक आणि ईशान्य भारतात पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोकण ते मराठवाडा... पावसाच्या तुफान सरी; IMD चा नवा अंदाज आला, या राज्यांनाही अलर्ट
imd rain alert for 16 june
Image Credit source: Google
| Updated on: Jun 15, 2026 | 10:36 PM

राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी अद्याप पावसाला सुरुवात झालेली नाही. मात्र आता उद्यापासून हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. नैऋत्य मान्सूनची आगेकूच सातत्याने सुरू असून, दक्षिण, ईशान्य, पूर्व आणि मध्य भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर उत्तर-पश्चिम भारतात सक्रिय असलेल्या पश्चिमी विक्षोभ आणि चक्रीय वाऱ्यांमुळे मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने अनेक राज्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. राज्याच्या कोणत्या भागात कसे हवामान असेल याबाबत माहिती जाणून घेऊयात.

उत्तर भारतातील हवामान

जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मंगळवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. डोंगराळ भागांत काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो. पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली-एनसीआरमध्ये ढगाळ वातावरण राहील. तसेच काही भागात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. पश्चिम आणि मध्य उत्तर प्रदेशातही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या भागांमध्ये ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात.

बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालचे हवामान

पूर्व आणि मध्य भारतात मान्सून आणखी सक्रीय होण्याची शक्यका आहे. त्यामुळे बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि छत्तीसगडच्या अनेक भागांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. ओडिशा आणि झारखंडमधील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पूर्व मध्य प्रदेशातही पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. छत्तीसगड आणि आसपासच्या भागांत विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे.

आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. आसाम आणि मेघालयच्या काही भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सततच्या पावसामुळे नद्यांच्या पाण्याची पातळी वाढण्याची तसेच सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता आहे. डोंगराळ भागांत भूस्खलनाचा धोकाही कायम राहणार आहे.

केरळ आणि कर्नाटकमध्ये मान्सून सक्रीय

दक्षिण भारतात मान्सून पूर्णपणे सक्रिय आहे. केरळ, किनारी कर्नाटक, दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि गोव्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. केरळ आणि कर्नाटकमधील काही जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. तमिळनाडू, पुडुचेरी, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. समुद्रकिनारी भागांत जोरदार वारे वाहण्याचा अंदाज असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मुंबई आणि गोव्यातही पावसाची शक्यता

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, कोकण-गोवा, गुजरात आणि मराठवाड्यात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे आणि कोकण परिसरात अधूनमधून जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण गुजरातमध्येही मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पूर्व राजस्थानातील काही जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. त्यामुळे नागरिकांनी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Us